लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील बहुतेक गावांमध्ये पुर्वी गोठ्यामध्ये खिलार गाय-बैल मोठ्या प्रमाणावर असत. परंतु शासनाच्या बैल गाडा शर्यत बंदी मुळे ग्रामीण भागातील गोठ्यातील खिलार गाय-बैल आता नामशेष झाले आहे.राज्यातील देशी जनावरांमधील सर्वात सुंदर व रुबाबदार म्हणून ओळखली जाणारी खिलार प्रवर्गातील गाय-बैल सध्या नामशेष अथवा दुर्मिळ झाल्याने ग्रामीण भागातील गोठ्यातील ते वैभव आता ओसरु लागले आहे.पुर्वी ग्रामीण भागातील प्रत्येक शेतकरी वर्गाच्या गाईच्या गोठ्यात खिलार गाय असायची. खिलार गाय दुध कमी देत असली तरी शरीरयेष्ठीने अत्यंत चपळ व दिसायला सुंदर असणारी या प्रवर्गातील गाय व बैल माणसांच्या मनाला मोहिनी घालतात. खिलार गायीचे दुध दोन प्रकारात मोडते.तल्लख बुद्धी व निरोगी शरीरांसाठी अतिशय उत्कृष्ट पोषणमुल्य असलेले हे दुध आज दुर्मिळ होत चालले आहे.देशात देशी गायीच्या दुधाबाबत जागरूकता दिवसेंदिवस वाढत असुनही खिलारच्या दुधवाढीबाबत अनेक वर्षापासुन काहीच प्रयत्न झालेले दिसत नाही. यांचा परिणाम म्हणून शेजारील राज्यांतुन गिर गायीची जाहिरात होऊन अशा स्वरूपांच्या गायी सध्या महाराष्ट्रांच्या ग्रामीण भागातील शेतकरी खरेदी करतांना दिसत आहे.त्यामध्येही जातीवंत गिर गाय पाहायला मिळत नाही. त्यात काही प्रमाणात संकरीत प्रमाण आढळून येत आहे. त्या गाई त्या भागात कमी किंमतीत विकल्या जातात. म्हणून तिची जाहिरात करून आपल्याकडे गीर गाय रूपाने जास्त किंमतीत विकल्या जात आहे.महाराष्ट्रातील खिलार गायीच्या बाबतीत असा प्रयत्न कोणी करतांना दिसत नाही. म्हणून महाराष्ट्रातील खिलार प्रवर्गातील गाय आजअखेरीच्या घटका मोजत आहे.खिलार गायीपासुन तयार होणारे बैल अतिशय रूबाबदार व चपळ समजले जातात. खिलार जातीचे मुळ कर्नाटकांच्या हल्लीकर जातीमध्ये सापडते. असे जाणकार शेतकरी वर्गातुन बोलले जाते.देशी खिलार गायीच्या वासरांमध्ये बैल असल्यास त्यांचा वापर शेती व बैलगाडा शर्यतीसाठी गेला जातो. खिलार गायीच्या वासरांला पंचवीस हजार ते दीड लाख रुपयां पर्यंत किंमत मोजावी लागत आहे. परंतु आता शेती यांत्रिकीकरणांवर केली जाते, व बैलगाडा शर्यती बंद झाल्यामुळे खिलार बैल खरेदीला बहुतांशी शेतकरी वर्गाने राम राम ठोकला आहे.
(२९ लखमापूर १)