नाशिक : खासदार राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना भाजपाला विरोध करीत असली व नंबर दोनचे नेते तथा मंत्री सदाभाऊ खोत हे भाजपाला पाठिंबा देत असले तरी त्यांना भाजपामध्ये आणण्याचे कोणतेही प्रयत्न सुरू नसल्याचे स्पष्टीकरण भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पत्रकार परिषदेत दिले़ मखमलाबाद येथील जाहीर सभेनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली़ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी हे भाजपाला विरोध करून शिवसेना पाठिंबा देत असताना याच संघटनेचे सदाभाऊ खोत हे मुख्यमंत्र्यांसोबत भाजपाचा प्रचार करीत असल्याच्या एका सभेत दिसून आले़ इतकेच नव्हे तर त्यांनी गळ्यात भाजपाचा स्कार्फही घातला होता़ त्यामुळे सदाभाऊ खोत यांना भाजपामध्ये आणण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू असल्याच्या चर्चा सुरू होत्या़ यावर पत्रकारांनी दानवे यांना विचारले असता ते युतीचा धर्म तसेच मंत्री म्हणून भाजपाचा प्रचार करीत असल्याचे सांगितले असून, त्यांना पक्षात घेण्याबाबत कोणतेही प्रयत्न सुरू नसल्याचे सांगितले़ शेतकऱ्यांना कर्जमुक्त केल्यास सरकारला पाठिंबा या शिवसेनेच्या भूमिकेबाबत दानवे म्हणाले की, कर्जमुक्तीची भूमिका आमचीही असून उत्तर प्रदेशात तशी घोषणाही करण्यात आली आहे़ महाराष्ट्रात २००८ व त्यानंतर अशी दोन वेळा कर्जमाफी करून शेतकरी कर्जमुक्त झालेला नाही़ त्यामुळे केवळ कर्जमुक्तीपेक्षा शाश्वत विकास व शेती गुंतवणुकीवर आम्ही भर दिल्याचे सांगितले़ (प्रतिनिधी)
खोत ‘स्वाभिमानी’तच राहणार : दानवे
By admin | Published: February 18, 2017 12:25 AM