खर्डे : भारतीय डाक विभागाच्या माध्यमातून खुंटेवाडी, ता. देवळा या गावातील प्रत्येक कुटुंब इंडियन पोस्ट पेमेंट्स बँकचे (आयपीपीबी) खातेधारक झाले असून, येथे कॅशलेस व्यवहाराला सुरुवात झाल्याने देशात सर्वप्रथम आयपीपीबीचे डिजिटल ग्राम होण्याचा मान खुंटेवाडी या गावाने पटकावला आहे.शुक्र वारी (दि.१२) खुंटेवाडी येथे झालेल्या ‘माझा अभिमान-सक्षम ग्राम’ कार्यक्रमात डाक विभागाने याबाबत शिक्कामोर्तब केले असून, सदर माहिती डाक विभागाच्या वतीने शासनाकडे पाठविण्यात आल्याची माहिती मालेगाव विभागाचे प्रमुख डाक अधीक्षक नागेश्वर रेड्डी यांनी दिली. या बँकेमुळे गावात आर्थिक व्यवहार होण्यास सुरुवात झाली आहे, तेही कॅशलेस ! या गावातील सर्व ३७८ कुटुंबातील ६७८व्यक्तींचे व ६ व्यावसायिकांचे आयपीपीबीचे खाते खोलत यातून आर्थिक व्यवहार सुरू झाले आहेत. सर्व अनुदाने, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती, सबसिडी या खात्यावर वर्ग करण्याचे नियोजन असून, वीजबिले, विमा अशा सर्वप्रकारचा भरणा येथून करणे शक्य होणार आहे. येथील ग्रामस्थांचा विश्वास व डाक विभागाचे सहकार्य यातून एक महिन्याच्या आत गावाने हे शक्य केले. त्यासाठी येथील उपसरपंच भाऊसाहेब पगार यांनी सर्वांशी संवाद साधत डिजिटल ग्रामचे स्वप्न पूर्ण केले. यासाठी मुंबईच्या पोस्ट मास्टर जनरल शोभा मधाळे यांचे मार्गदर्शन लाभले.यावेळी झालेल्या कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी सरपंच मीना निकम होत्या. उपविभागीय डाक निरीक्षक डी.जी. उमाळे, आयपीपीबीचे वरिष्ठ प्रबंधक परमेश्वर क्षीरसागर, क्षेत्रीय प्रबंधक राजीव दुबे यांनी यावेळी मनोगत व्यक्त करत गावाने मिळवलेल्या या यशाबद्दल प्रमुख पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला. देवळा नगरपंचायतीचे गटनेते जितेंद्र आहेर, प्रसिद्ध कांदा व्यापारी अमोल आहेर यांच्यासह डाक अवेक्षक एस.के.पगार, के.एस. कुवर, मुख्याध्यापक पी.के. सूर्यवंशी, पोलीसपाटील कल्पना भामरे व देवळा सटाणा उपविभागातील डाक कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्र म यशस्वीतेसाठी पोस्ट मास्तर भिला भामरे, गौरव पगार, अनिल भामरे, गणेश भामरे आदी प्रयत्नशील होते. कार्यक्र माचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन मोठाभाऊ पगार यांनी केले.
खुंटेवाडी देशातील पहिले आयपीपीबी डिजिटल ग्राम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 1:54 AM