नाशिक : ‘हम फुलों की तरह अपनी आदतसे बेबस है, तोडने वालेको भी खुशबू देते है’.... हा डॉयलॉग ऐकवत तुकाराम मुंढे यांनी नवी मुंबई महापालिकेत आयुक्त असताना सन २०१७-१८ चे अंदाजपत्रक सादर करतेवेळी प्रत्येक नगरसेवकाला स्वेच्छा निधी १० लाख आणि प्रतिनगरसेवक ४० लाख रुपये प्रभाग निधी देण्याचा उदारपणा दाखविला होता. मात्र, नाशिक महापालिकेचे अंदाजपत्रक सादर करताना त्यांनी नगरसेवक निधीवर फुली मारल्याने लोकप्रतिनिधींना फुलाचा सुगंध मिळण्याऐवजी काटे बोचले. दोन महापालिकांमध्ये नगरसेवक निधीबाबत वेगवेगळी भूमिका घेणाऱ्या मुंढे यांच्या रामशास्त्री बाण्याविषयी शंका उपस्थित केल्या जाऊ लागल्या आहेत. नाशिक महापालिकेत नगरसेवकांना त्यांच्या प्रभागांमध्ये नागरिकांनी केलेल्या मागण्यांनुसार विविध विकासकामे करण्यासाठी स्वतंत्ररीत्या नगरसेवक निधी देण्याची प्रथा आहे. या परंपरेला कायद्याचा आधार नाही. परंतु, आयुक्त आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील परस्पर समन्वयातून महापालिकेची आर्थिक स्थिती पाहून नगरसेवक निधीची तरतूद अंदाजपत्रकात करण्यात येत असते. भाजपाने मागील वर्षी महापालिकेत सत्ता स्थापन केल्यानंतर महापौर रंजना भानसी यांनी प्रत्येक नगरसेवकाला प्रभागाच्या विकासासाठी ७५ लाख रुपयांचा निधी बहाल केला होता. त्यानुसार त्या-त्या विभागाकडून अनेक कामांच्या निविदाही काढण्यात आल्या. दरम्यान, तुकाराम मुंढे यांनी आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी कामाची गरज, तांत्रिक योग्यता आणि व्यवहार्यता या त्रिसूत्रीचा अवलंब करत नगरसेवक निधीतील कामांना ब्रेक लावला. शिवाय, नगरसेवक निधी ही संकल्पनाच नियमात नसल्याने तो देता येणार नाही, अशी स्पष्ट भूमिका घेतली होती. मात्र, स्थायी समितीने आयुक्तांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकात ७५ लाख रुपयांचा निधी ‘प्रभाग विकास निधी’ या नावाने समाविष्ट करत त्यासाठी ९२ कोटी रुपयांची तरतूद केली. महासभेवर स्थायीने अंदाजपत्रक सादर केले त्यावेळी आयुक्तांनी पावणेदोन तास भाषण करत कोणत्याही परिस्थितीत आयुक्तांच्या अंदाजपत्रकाव्यतिरिक्त भर घातलेली कामे मान्य केली जाणार नसल्याची भूमिका घेत नगरसेवक निधीचा विषय टोलवून लावला होता. मात्र, याच तुकाराम मुंढे यांनी नवी मुंबईत आयुक्त असताना सन २०१७-१८ चे अंदाजपत्रक सादर करतेवेळी प्रतिनगरसेवक १० लाख रुपये नगरसेवक स्वेच्छा निधी व प्रतिनगरसेवक ४० लाख रुपये प्रभाग निधी दिला होता. शिवाय, अशाप्रकारे प्रथमत:च स्वतंत्ररीत्या तरतूद करण्यात आल्याचेही मुंढे यांनी म्हटले आहे. या निधीमुळे नगरसेवकांना प्रभागामधील अत्यावश्यक व गरजेची कामे त्वरित करणे शक्य होईल, जेणेकरून नगरसेवक सुचवत असलेल्या कामाविषयी कोणत्याही तक्रारीला वाव राहणार नाही, असेही मुंढे यांनी नवी मुंबई महापालिकेच्या अंदाजपत्रकात नमूद केले होेते. त्यामुळे, नवी मुंबईसाठी एक न्याय तर नाशिकसाठी वेगळा न्याय देण्याची भूमिका घेणाºया मुंढे यांच्या या दुहेरी भूमिकेविषयी आता चर्चा रंगली आहे.उत्पन्न वाढवा, निधी देतो!नवी मुंबई आणि नाशिकबाबत नगरसेवक निधीविषयी घेतलेल्या वेगवेगळ्या भूमिकेबाबत आयुक्त तुकाराम मुंढे यांना पत्रकारांनी विचारणा केली असता मुंढे म्हणाले, नवी मुंबई आणि नाशिकची तुलना होऊ शकत नाही. नवी मुंबईचे अंदाजपत्रक हे तीन हजार कोटींचे होते. उत्पन्नाची जमा बाजू लक्षात घेऊन प्रभाग निधी देण्यात आला होता. पैसे असतील तरच प्रभाग निधी मिळेल. महापालिकेच्या उत्पन्नात भर पडली तर नक्कीच निधी दिला जाईल, असेही मुंढे यांनी स्पष्ट केले.
नवी मुंबईला ‘खुशबू’; नाशिकला मात्र ‘काटे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2018 12:44 AM