इगतपुरी : येथील लोहमार्ग पोलिसांनी मुंबईतील बांद्रा येथील रहिवासी चेतना नरेश बागोरिया (१६) या अपहृत मुलीस सुखरूप पालकांच्या स्वाधीन केले. सोमवारी (दि. १२) सायंकाळी चार वाजता इगतपुरी स्थानकात मुंबईहून येणाऱ्या मंगला एक्स्प्रेसमधून सदर मुलगी प्रवास करीत होती. यावेळी इगतपुरी लोहमार्ग पोलीस गस्त करीत होते. गाडी तपासणीदरम्यान आॅन ड्युटी तिकीट तपासणीसांना एक मुलगी विनातिकीट प्रवास करीत असल्याचे निदर्शनास आले. संबंधित तिकीट तपासणीसांनी लोहमार्ग पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांची चाहुल लागताच तिच्या आजूबाजूला असलेल्यांनी काढता पाय घेतला. माहितीवरून सहायक पोलीस उपनिरीक्षक शिवाजी इघे, पोलीस नाईक संजीव पारधी, पोलीस कॉन्स्टेबल सतीश खार्डे, रेल्वे लेखाविभाग कर्मचारी आनंद शिंदे यांनी सदर मुलीची चौकशी केली असता तिचे मुंबई येथून अपहरण झाल्याचे उघडकीस आले. सदर प्रकार गंभीर असल्याने शिवाजी इघे यांनी इगतपुरी लोहमार्ग पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास केला. सदर मुलीच्या पालकांनी निर्मलनगर पोलीस ठाणे खार, पूर्व मुंबई येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याचे समजले. इगतपुरी पोलिसांनी निर्मलनगर पोलीस ठाण्यास सदर मुलीबाबत माहिती दिली. त्यानंतर निर्मलनगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी व मुलीचे नातेवाईक इगतपुरी येथे आले. ओळख पटल्यानंतर मुलीला पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. यावेळी इगतपुरी लोहमार्ग सहायक पोलीस निरिक्षक सुधीर पाटील, पोलीस नाईक शिवाजी इघे, सतीश खार्डे आदी उपस्थीत होते.
अपहृत मुलीस लोहमार्ग पोलिसांनी केले पालकांच्या स्वाधीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 1:04 AM