नाशिक : लॉकडाउन काळात स्थलांतरीत मजुरांपैकी पायपीट करणाऱ्या कुटुंबियांचा शोध घेत त्यांच्यापैकी महिला, मुलींना फूस लावून किंवा लिफ्टच्या बहाण्याने वाहनात बसवूून अपहरण करणा-या वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात राहणा-या एका सराईत गुन्हेगाराला शहर गुन्हे शाखा युनीट-१च्या पथकाने हाती कुठलेही धागेदोरे नसताना केवळ वर्णनाच्या अधारे शिताफीने कौशल्याचा वापर करत नाशिकरोडमध्ये बेड्या ठोकल्या.कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउनचा चौथा टप्पा सुरू असून परराज्यात मजुरांना रेल्वे, एसटी बसेसद्वारे पोहचविले जात आहे. दरम्यान, यापुर्वी काही मजुर पायी प्रवासाला निघाले होते. दरम्यान, वाशिम जिल्ह्यातील संशयित सराईत गुन्हेगार गणेश सखाराम बांगर (३२) याने नसीराबाद पोलीस ठाणे हद्दीत अकोला (जि.अमरावती) येथे मुळ गावी चाललेल्या एका मजुराच्या कुटुंबाला थांबविले. त्यांना वाहनातून मदत करण्याचा बहाणा करत कुटुंबातील एका १२ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचे मंगळवारी (दि.१९) अपहरण केले. भावाच्या तक्रारीवरून नसिरबाद पोलीस ठाण्यात एका अज्ञात इसमाविरूध्द अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.संशयित आरोपीच्या शोधात भुसावळ येथील गुन्हे शोध पथकही रवाना झाले. जळगाव, बुलढाणा, वाशिम, अमरावती या चार जिल्ह्यांचे पोलीस संशयित आरोपीच्या मागावर मागावर होते. सराईत गुन्हेगार बांगर हा पुण्यावरून नाशिकच्या दिशेने दुचाकीने येत असल्याची माहिती नवटके यांनी गुन्हे शाखेचे उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांना फोनवरून दिली. त्यानंतर पोलिसांनी माग काढण्यास सुरूवात केली. बांगरची माहिती देणा-यास बक्षीसदेखील पोलिसांकडून जाहीर करण्यात आले होते.पथकाने मध्यरात्रीपासून सोमवारी (दि.२५) पहाटेपर्यंत सिन्नर ते नाशिकरोड असा पुणे महामार्ग पिंजून काढला अखेर नाशिकरोड येथील बिटको चौकात बांगरच्या मुसक्या आवळण्यास पथकाला यश आले. संध्याकाळी त्यास जळगाव पोलिसांच्या हवाली करण्यात आले.
...असा आवळला फासउपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी पोलीस निरिक्षक आनंदा वाघ यांना याबाबत कारवाईचे आदेश दिले. त्यांनी उपनिरिक्षक बलराम पालकर यांच्या पथकाला सज्ज करत पुणे महामार्गावर सापळा रचण्यास सांगितले. सिन्नर येथून पथकातील रवींद्र बागुल, विशाल काठे, विशाल देवरे यांनी महामार्ग थेट नाशिकरोपर्यंत पिंजून काढला. त्याचे मोबाईल लोकेशनही सिन्नरपासून पुढे काही अंतरावर बंद झाले होते. नाशिकरोड रेल्वे स्थानकाकडे जात असताना पालकर यांना एक इसम संशयास्पदरित्या आढळला. पालकर याने त्याच्या शरीरयष्टी व वर्णनावरून त्याला ओळखले कारण काही वर्षांपुर्वी त्यांनी सातपूर पोलीस ठाणे हद्दीत बांगरला चोरीच्या गुन्ह्यात अटक केली होती.