नाशिक : शहर व परिसरात मागील दोन दिवसांत दोन तर आठवड्यात खूनाच्या तीन घटना समोर आल्या आहेत. पंचवटीतून एका सराईत गुंडाचे मोटारीतून अपहरण करून त्याचा खून करून मृतदेह जिल्ह्याबाहेर मोखाडा घाटात नेऊन पेटवून दिल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि.११) उघडकीस आली. संदेश चंद्रकांत काजळे (३५,रा.विजयनगर, सिडको) असे खून झालेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्या मित्रांनीच आर्थिक वादातून त्याचा काटा काढल्याचे बोलले जात आहे.
पंचवटी भागात गंभीर स्वरूपाचे गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेला सराईत गुंड आणि खासगी सावकारी करणारा काजळे यास मद्याच्या नशेत असताना त्याच्या चार ते पाच मित्रांनी त्याला निमाणी बस स्थानकासमोरील एका इमारतीच्या पार्किंगमधून मारहाण करत मोटारीत डांबले होाते. यानंतर मोखाडा येथे घेऊन जाऊन त्याचा खून करत खूनाचा पुराव नष्ट करण्याच्या हेतूने त्याचा मृतदेह ज्वलनशील पदार्थ ओतून पेटवून जाळण्याचाही प्रयत्न केल्याचे पोलिसांच्या तपासातून प्रथमदर्शनी समोर आले आहे. घटनास्थळाहून अर्धवटस्थितीत जळालेला मृतदेह मोखाडा पोलिसांनी ताब्यात घेतला. त्याची ओळख पटवून नाशिक पोलिसांना माहिती देण्यात आली. यानंतर गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने मुख्य सूत्रधार आरोपी स्वप्निल उन्हवणे यास अटक केली आहे. अपहरणासाठी वापरलेल्या गुन्ह्यातील मोटारही जप्त करण्यात आली आहे. उन्हवणे याच्यासोबत असलेल्या साथीदारांचा पोलिस शोध घेत आहेत.
सराईत गुंड काजळे याच्यावर यापूर्वी खंडणी, अवैध सावकारी, मारहाण, खूनाचा प्रयत्न, फसवणूक, दमदाटी, अँट्रोसिटीसह विविध स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पंचवटी पोलिसांत अपहरणाचा गुन्हाशुक्रवारी (दि.९) रात्री काजळे याचे पंचवटीतील निमाणी बसस्थानकासमोरील एका इमारतीच्या पाठीमागील पार्किंमधून संशयित आरोपी नितीन उर्फ पप्पू चौगुले (रा. मखमलाबाद रोड), रणजित आहेर व स्वप्निल दिनेश उन्हवणे (२३, दोघे रा. पंचवटी), पवन भालेराव(रा. त्र्यंबकेश्वर) आणि अन्य साथीदारांनी अपहरण केले होते. मयताचा चुलत भाऊ प्रितेश काजळे याने दिलेल्या फिर्यादीवरून पंचवटी पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता खुनाचा प्रकार उघड झाल्याने याच अपहरणाच्या गुन्ह्यात खुनाचे कलम वाढविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
चौघा आरोपींचा शोध सुरू
अपहरणाचा तपास पंचवटी पोलिसांकडून सुरू असतानाच रविवारी पहाटे मोखाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ताकपाडा परिसरातील निर्जन जंगलात काजळेचा अर्धवट जळालेला मृतदेह मोखाडा पोलिसांना आढळून आला. काजळे याच्या अपहरणाच्या दाखल गुन्ह्याची माहिती व त्याचे वर्णन जुळल्याने मोखाडा पोलिसांनी शहर पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली. त्यानुसार पंचवटी आणि गुन्हे शाखा युनिट एकने समांतर तपास सुरू केला. उन्हवणे हा इको कारसह त्र्यंबकेश्वर भागात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांच्या पथकाने सापळा रचून उन्हवणे यास अटक केली. तर उर्वरित चार जणांचा शोध सुरु आहे.