किकवारी बुद्रुक ग्रामपंचात अंतर्गत येत असलेल्या येथील वस्तीत आदीवासी कुटुंबे वास्तव्यास आहेत. या कुटुंबांचा उदरनिर्वाह मोलमजुरीवर अवलंबून आहे. त्यामुळे दिवसभर काम करु न संध्याकाळी त्यांना पाण्यासाठी धावपळ करावी लागते. कित्येकदा कुटुबांतील एका सदस्याला मजुरी बुडवुन पाणी भरण्यासाठी घरी रहावे लागते. तसेच वाघदर वस्तीत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अंगणवाडी आहे मात्र तेथे पाण्यासाठी कोणतीही सोय उपलब्ध नाही. रखरखत्या उन्हामुळे पाण्याची पातळी खोल जात असल्याने हातपंपाचे पाणी अचानक बंद पडते .त्यामुळे लोकांना एक हंडा भरण्यासाठी प्रतिक्षा करावी लागते. तसेच एकच हातपंप असल्याने पाणी भरण्यासाठी प्रतिक्षा करावी लागते. यंदा समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे किकवारी बुद्रुक परिसरातील गावांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. एक ते दीड महिण्यापासून उन्हाची तीव्रतेमुळे या भागातील पाण्याचा स्त्रोत आटल्याने पिण्याच्या पाण्याबरोबर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. त्यातच महिलांना हंडाभर पाण्यासाठी ऐन उन्हात पायपीट करावी लागत आहे. वस्तीतील महिलांना हंडाभर पाण्यासाठी दिवसभर उभे रहावे लागत आहे. संबंधित लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन या भागातील पाणीप्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी होत आहे.
किकवारी बुद्रुकला पाणीटंचाईमुळे महिलांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 6:30 PM