सटाणा : बागलाण तालुक्यातील आदर्शगाव म्हणून नोंद झालेले किकवारी खुर्द कमी पर्जन्यमानमुळे गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळाशी सामना करत आहे. दुष्काळावर मात करण्यासाठी वाहून जाणारे पाणी अडवणे आवश्यक आहे,यासाठी लोकप्रतिनिधींचे उंबरठे झिजविले मात्र गावकऱ्यांच्या पदरी निराशाच आली. अखेर वेळ न दवडता किकवारीकरांनी लोकसहभागातून पावसाळ्यापूर्वीच हत्ती नदीपात्र, ब्राम्हणदरा , वाघदर नाल्याचे तब्बल दीड किलोमीटर खोलीकरण करून पुनर्जीवन केले. या शिरपूर पॅटर्नमुळे पावसाचा वाहून जाणारा प्रत्येक थेंब अडवला जाणार आहे. परिणामी, भविष्यात किकवारी खुर्द परिसरातील सहा किलोमीटर परिसरातील आठ ते नऊशे हेक्टर जमीन ओलिताखाली येणार असल्याने या एकजुटीमुळे किकवारीकरांनी एक नवा आदर्श घालून दिला आहे.आदर्शगाव किकवारी खुर्द परिसर म्हणजे एकेकाळी पावसाचे आगर होते. मात्र गेल्या दोन ते तीन वर्षापासून पर्जन्यमान कमी झाल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. विहिरींनी तळ गाठला. नदी,नाले,धरणे कोरडी पडली. शेती हाच मुख्य व्यवसाय असल्यामुळे पाण्याअभावी शेती व्यवसाय धोक्यात सापडला. दुष्काळ निवारणासाठी शासन उपयोजना करेल, बागलाण तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करून शासन काहीतरी ठोस पाऊले उचलून जलसंधारणेची कामे करेल अशी आशा किकवारीकरांना होती. मात्र पदरी निराशाच पडल्यानंतर शासनाच्या निधीची व मदतीची अपेक्षा न करता लोकसहभाग व लोकवर्गणीच्या माध्यमातून गाव पुढे सरसावले. आदर्श ग्रामचे शिल्पकार केदा बापू काकुळते यांनी ग्रामसभा घेऊन आपली भूमिका मांडली व सर्व ग्रामस्थांनी एकत्र येत लोकवर्गणी जमा केली. गावाला लाभलेल्या दीड किलोमीटर लांबीच्या हत्ती नदीवर जेसीबीने खोलीकरण करून नदीचे पुनर्जीवन केले.
किकवारीकरांचा पुढाकार, लोकसहभागातून शिरपूर पॅटर्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2019 5:21 PM
हत्ती नदीचे दीड किलोमीटर खोलीकरण
ठळक मुद्देगावाला लाभलेल्या दीड किलोमीटर लांबीच्या हत्ती नदीवर जेसीबीने खोलीकरण करून नदीचे पुनर्जीवन केले.