नाशिक : प्रेयसीच्या पहिल्या पतीपासून झालेल्या मुला-मुलीला धुण्याच्या धोपटण्याने बेदम मारहाण करून त्यातील मुलाला जिवे ठार मारण्याच्या आरोपात प्रियकराला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ओ. एस. वाघवसे यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारवाडा पोलीस ठाण्यात २५ ते २६ फेब्रुवारी १८ च्या रात्री मिशन मळा परिसरातील भारती डॅनियल रेडी यांच्या भाड्याच्या खोलीत आरोपी सोनुबाई उर्फ सोनाली सुधाकर थोरात (२७) व तिचा प्रियकर साहील उर्फ निरंजन उर्फ पिल्लू जगप्रसाद चतुर्वेदी (३१, रा. खंडोबा चाळ पंचशीलनगर, एनडी पटेल रोड) यांनी सोनुबाईचा पहिला पती संतोष रमेश जाधव याच्यापासून झालेला मुलगा नकुल (६) व नंदिनी (१०) या दोघांना जिवे ठार मारण्याचे हेतूने धुण्याच्या धोपटणीने व हाताचे चापटीने, लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. यात मुलगा नकुलचा मृत्यू झाला. तर मुलगी नंदिनी गंभीर जखमी झाली होती. त्यामुळे सोनुबाईच्या शेजारी राहणार एस्तेर सतीश दलाल (२५) याने दिलेल्या फिर्यादीनुसार सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात गुन्हा सिद्ध होण्यासाठी आरोपींविरोधात जिल्हा न्यायालय दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर याप्रकरणात बुधवारी (दि.२४) प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ओे.एस. वाघवसे, यांनी परिस्थितीजन्य पुराव्यांनुसार साहील उर्फ निरंजन उर्फ पिल्लू जगप्रसाद चतुर्वेदी याला हत्येच्या प्रकरणात दोषी ठरवत जन्मठेप व एक हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. दंड न भारल्यास तीन महिन्यांचा साधा कारावास त्याचप्रमाणे गंभीर दुखापत करण्याच्या प्रकरणात तीन वर्ष सश्रम कारावास व ५०० रु. दंडाची शिक्षा सुनावली असून दंड न भरल्यास एक महिना साधा कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे ॲड. वाय.डी. कापसे यांनी कामकाज पाहिले.
प्रेयसीच्या मुलाची हत्या करणाऱ्यास जन्मठेप तीन वर्षांनंतर निकाल : मारहाणीत मुलीलाही झाली होती गंभीर दुखापत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 1:23 AM