प्राचार्य वैशाली पगार यांच्या पुस्तकाचे प्रकाशन
मालेगाव : महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित एचएच श्रीश्री मुरलीधर स्वामीजी कृषी महाविद्यालयातील उपप्राचार्य डॉ. पंकज सूर्यवंशी व उद्यानविद्या महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. वैशाली पगार यांच्या सेंद्रिय शेतीची तत्त्वे या पुस्तकाचे प्रकाशन माजी आमदार अपूर्व हिरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ. सुभाष निकम, डॉ. सतीश राऊत, प्राचार्य हेमंत जाधव उपस्थित होते.
-----
नागरिकांना लागले नववर्ष स्वागताचे वेध
मालेगाव : चार दिवसांनी वर्ष संपत असून, नवीन वर्षास प्रारंभ होत असल्याने शहरातील तरुणांना नववर्ष साजरा करण्याचे वेध लागले आहेत. कोरोनामुळे रात्रीची संचारबंदी असल्याने त्यावर पर्याय म्हणून तरुणांकडून विविध मार्गांचा अवलंब केला जात आहे.
-----
ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी
मालेगाव : तालुक्यातील ९९ ग्रामपंचायतींमध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी पहिल्या दोन दिवसांत १५९ उमेदवारी अर्ज दाखल झाले असून, गावागावांत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. अर्ज भरलेल्या उमेदवारांकडून गावामध्ये प्रचार सुरू झाला असून, पॅनल बनविण्यासाठी प्रमुखांकडून प्रयत्न सुरू आहेत.
-----
मालेगावी चर्चमध्ये ख्रिसमस साजरा
मालेगाव : शहरातील मालेगाव कॅम्प परिसरात असलेल्या चर्चमध्ये नाताळ सण कोरोनाचे नियम पाळून उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त काही कार्यक्रमांना फाटा देण्यात आला. शहरातील नागरिकांनी ख्रिश्चन बांधवांना ख्रिसमस व नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी येशूची गीतांचे गायन करण्यात आले.
----
भाजीपाला दरात घसरण
मालेगाव : भाजीपाल्याच्या दरात घसरण झाली असून, शेतकऱ्यांसह भाजीपाला विक्रेत्यांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. गेल्या महिन्याभरापूर्वी भाजीपाला दरात वाढ झाली होती. कोथिंबीर जुडी १०० रुपयांवर पोहोचली होती. अचानक काही दिवसात भाजीपाल्याच्या उत्पादनात वाढ झाल्यामुळे मागणीत घट झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
-----
गुलाबी थंडीमुळे हाल
मालेगाव : शहर परिसरात मोठ्या प्रमाणात थंडीचा कडाका वाढत असून, उघड्यावर राहणाऱ्या लोकांचे हाल होत आहेत. थंडीपासून बचावासाठी ठिकठिकाणी शेकोट्या पेटविल्या जात आहेत. नागरिकांनी अडगळीत ठेवलेले उबदार कपडे बाहेर काढले आहेत. तर काही नागरिकांनी बाजारपेठेत उबदार कपडे घेण्यासाठी गर्दी केली आहे.
----
संभाजी कॉलनी परिसरात रस्त्यांची दुरवस्था
मालेगाव : कॅम्पातील संभाजी कॉलनी परिसरात रस्त्यांची दुरवस्था झाली असून, ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. काही भागात रस्त्यावरील खडी उखडून वर आली आहे, तर काही ठिकाणी रस्त्यांची दुरुस्ती सुरू असून, केवळ खडी टाकून ठेवण्यात आली आहे. त्यामुळे वाहनचालकांचे हाल होत आहेत.
-----
मालेगाव परिसरात जनावरांच्या वाढत्या चोऱ्या
मालेगाव : शहर परिसरात जनावरांच्या चोऱ्या वाढल्या असून, शेतकऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे. पोलिसांकडून छापे टाकून जनावरे जप्त केली जात असली तरी चोरीच्या घटना वाढतच आहेत. परजिल्ह्यातून जनावरे चोरून मालेगावी विक्री केली जात आहे.
----
मालेगावी उद्याने दुरुस्तीची मागणी
मालेगाव : शहरात ठिकठिकाणी असलेल्या उद्यानांची दुरवस्था झाली असून, देखभालअभावी झाडे व लहान मुलांच्या खेळण्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शहरातील सुमारे २२ उद्याने देखभाल व दुरुस्तीअभावी तशीच पडून आहेत. महापालिकेने शहरातील उद्यानांची दुरुस्ती करून ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बाके बसवावीत. तसेच लहान मुलांना खेळण्यासाठी खेळणी बसवावीत, अशी मागणी होत आहे.