शैलेश कर्पे सिन्नरशेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी भारत सरकारच्या कृषी विभागाच्या परवानगीने चालविल्या जाणाऱ्या ‘किसान कॉल सेंटर’चा सल्ला घेणे अवर्षणग्रस्त सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्याला भलतेच महागात पडले. या किसान कॉल सेंटरने पाठविलेल्या ‘एसएमएस’च्या आधारे ढोबळी मिरचीच्या पिकावर औषधाची फवारणी केल्यानंतर सर्वच्या सर्व फुले गळून जाण्यासह पीकही सुकून गेले. यामुळे कारवाडी येथील शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.सिन्नर तालुक्याच्या पूर्वभागातील कारवाडी येथील दगेश पोपट बहिरट या युवा शेतकऱ्याने अस्मानी व सुलतानी या सर्व संकटांचा सामना करीत आपल्या तीन हजार चौस मीटर क्षेत्रावर नेटशेडमध्ये ढोबळी मिरचीची लागवड केली आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे या भागात अस्मानी संकटे यापूर्वी आली आहेत. याचा विचार करून अवकाळी पाऊस किंवा गारपीट यामुळे पिकाचे नुकसान होऊ नये यासाठी त्याने शेडनेटसाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला आहे. दुष्काळात ठिबकच्या साहाय्याने दगेश बहिरट या शेतकऱ्याने ढोबळी मिरचीची लागवड केली.आधुनिक शेतीची कास घेतलेल्या बहिरट यांच्या मेहनत व कष्टाच्या जोरावर ढोबळी मिरचीचे पीक चांगले जोमात आले होते. पहिल्या तोड्यात बहिरट यांनी १३० जाळी ढोबळी मिरचीचे उत्पन्न मिळाले. मात्र किरकोळ प्रमाणात फुलगळ होत असल्याने ती रोखण्यासाठी व आणखी चांगले उत्पन्न मिळावे यासाठी बहिरट यांनी इफको किसान संचार लिमिटेडच्या पुणे येथील १८००१८०१५५१ या टोल फ्री क्रमांकावर फोन करून सल्ला विचारला होता. यानंतर दुसऱ्याच मिनिटाला या किसान कॉल सेंटरकडून बहिरट यांना एसएमएस आला. त्यावर प्लनोफिक्स ५ मिली व ६० ग्रॅम ००:५२:३४ हे १५ लिटर पाण्यात एकत्र करून ते फवारण्याचा सल्ला देण्यात आला होता. बहिरट यांनी त्याप्रमाणे फवारणी केली.फवारणी केल्यानंतर अर्धा तासाच्या आत ढोबळी मिरचीच्या सर्व फुलांची गळ होऊन पीक सुकण्यास प्रारंभ झाला. बहिरट यांना पहिल्या तोडीपासून १३० जाळी उत्पन्न मिळाले होते. दुसऱ्या तोडीच्या आत सर्व फुलगळ झाल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याची तक्रार बहिरट यांनी पंचायत समिती व तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे केली आहे. याबाबत कॉल सेंटरकडे फोनवरून तक्रार केल्यानंतर पहाणीसाठी येणार असल्याचे आश्वासन दिले जात आहे. सिन्नरचा पूर्वभाग दुष्काळी म्हणून ओळखला जातो. अशा परिस्थितीत आधुनिक पद्धतीचा अवलंब करून व किसान कॉल सेंटरची मदत घेऊन उभ्या केलेल्या पिकाचे उत्पन्न वाढण्यापेक्षा चुकीच्या सल्ल्यामुळे नुकसान होत असेल तर दाद कोणाकडे मागायची असा सवाल उपस्थित केला जात आहे. (वार्ताहर)
‘किसान कॉल सेंटर’चा सल्ला पडला महागात
By admin | Published: February 22, 2016 11:02 PM