नाशिकरोड : दोन महिन्यांपूर्वी शेतकऱ्यांचा शेतमालाची वाहतूक करण्यासाठी देवळालीतून सुरू झालेल्या किसान रेल्वेला चांगला प्रतिसाद मिळत असून, आत्तापर्यंत १२ हजार ४०० टन विविध वस्तूंची वाहतूक या माध्यमातून करण्यात आली आहे.
मध्य रेल्वेने देशात सर्वप्रथम देवळाली ते मुझफ्फरपूर ही किसान रेल सुरू करून लॉकडाऊनमध्ये शेतकऱ्यांना दिलासा दिला. आता ही गाडी आठवड्यातून तीन वेळेस धावू लागली आहे. तसेच नागपूर ते आदर्शनगर, दिल्ली (साप्ताहिक), सांगोला ते मनमाड (त्रि-साप्ताहिक) आणि सांगोला ते सिकंदराबाद (साप्ताहिक) या आणखी किसान रेल सुरू केल्या आहेत. बर्फात ठेवलेले मासे, डाळिंब, कॅप्सिकम, हिरवी मिरची, आले, भाजीपाला व नाशवंत वस्तूंची किसान रेल्वे वाहतूक करत आहे.
लॉकडाऊन व अनलॉक कालावधीदरम्यान रेल्वेने प्राधान्याने अत्यावश्यक वस्तू व मालाची वाहतूक केली. फळ आणि भाजीपाला यासारख्या नाशवंत वस्तूंच्या वाहतुकीसाठी किसान रेलची सुरुवात करून शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या विक्रीसाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
मागील ७ महिन्यांत मध्य रेल्वेने सुमारे १३,४०० मालवाहतूक गाड्या चालवल्या. दररोज सरासरी २,७७६ वॅगनप्रमाणे एकूण ६.४४ लाख वॅगन्समधून विविध वस्तूंची वाहतूक केली आहे. मध्य रेल्वेने २.५० लाख वॅगन्समधून कोळसा, १.९५ लाख वॅगन्समधून कंटेनर्स, ४२,९८५ वॅगन्समधून सिमेंट, ५,१२७ वॅगन्समधून अन्नधान्य, ३०,२२२ वॅगन्समधून खते, ६०,५४१ वॅगन्समधून पेट्रोल, तेल व वंगण, १६,९७३ वॅगन्समधून पोलाद, ३३०३ वॅगन्समधून साखर, ७,८०५ वॅगन्समधून कांदा, २,३२७ वॅगन्समधून कडबा तर संकीर्ण मालाची २८,७२७ वॅगन्समधून वाहतूक केली आहे.