या वाहन मार्चमध्ये अखिल भारतीय किसान सभा, सीटू कामगार संघटना, अखिल भारतीय शेतमजूर युनियन, अखिल भारतीय जनवादी महिला संघटना, डीवायएफआय व एसएफआय ही विद्यार्थी संघटना सहभागी होणार असून, नाशिक येथून निघालेला हा वाहन मार्च शनिवारी सायंकाळी घाटनदेवी येथे रात्री मुक्कामी थांबेल व रविवारी सकाळी मुंबईकडे प्रयाण करेल. दिल्लीतील शेतकरी आंदोलन तीव्र करण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाने देशभर २३ ते २६ जानेवारी या काळात सर्व राज्यांच्या राजधान्यांमध्ये राज्यपाल भवनांवर आंदोलन करण्याची हाक दिली आहे. त्यानुसार मुंबई येथील आझाद मैदान येथे या आवाहनानुसार सुरू करण्यात येत असलेल्या महामुक्काम सत्याग्रहात किसान सभेचा हा वाहन मार्च सामील होईल.
शेतकरीविरोधी कृषी कायदे रद्द करा, शेतीमालाला आधार भावाचे संरक्षण देणारा कायदा करा, वीज विधेयक मागे घ्या, कामगार संहितेमधील कामगार विरोधी बदल रद्द करा, वनजमीन तथा देवस्थान, गायरान, आकारीपड, बेनामी व वरकस जमीन कसणाऱ्यांच्या नावे करा आणि महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी पुन्हा सुरू करून सर्व शेतकऱ्यांना योजनेचा लाभ द्या या मागण्या आंदोलनात करण्यात येणार असल्याचेही कॉ. नवले यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, राज्य अध्यक्ष किसन गुजर, सुनील मालुसरे, डॉ. डी. एल. कराड आदी उपस्थित होते.