------
नाशिक : शहरात मागील काही दिवसांपासून केवळ बुलेट दुचाकींची चोरी होण्याचे प्रमाण वाढले होते भद्रकाली पोलिस ठाणे हद्दीत घडलेल्या अशाच एका बुलेट दुचाकीच्या शोध घेत असताना सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून गुन्हे शाखा युनिट 1 च्या पथकाने चोरट्याचा थेट नंदुरबार पर्यंत माग काढला आणि शिताफीने सापळा रचून त्याला अटक केली. तो मूळ सुरत येथील रहिवाशी असल्याचे समोर आले असून तो गुजरात आणि महाराष्ट्रात केवळ बुलेट चोरीसाठी घुसखोरी करत होता असे पोलिसांनी सांगितले. त्याच्या ताब्यातून चोरी केलेल्या सात बुलेटसह अन्य दोन दुचाकी हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
दुचाकीमध्ये केवळ बुलेटवर वक्रदृष्टी ठेवून त्यांची चोरी करण्यात सराईत असलेल्या संशयित आरोपी पवन ऊर्फ विक्की प्रेमचंद पाटील (२५,रा. सुरत, गुजरात) यास गुन्हे शाखा युनिट-1च्या पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे नंदुरबार मधून अटक केली. विक्की याने सुरत येथून 4, धुळेमधून2, पंचवटी, मुंबईनाका व भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून प्रत्येकी १-१ अशा 9 दुचाकी चोरल्याची कबुली त्याने दिली. हस्तगत केलेल्या दुचाकींची किंमत 10 लाख 80 हजार रुपये इतकी आहे. न्यायालयाने त्यास मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आनंदा वाघ, सहायक निरीक्षक महेश कुलकर्णी, रघुनाथ शेगर, दिनेश खैरनार, मुख्तार शेख मोतीराम चव्हाण पथकाने ही कारवाई केली.
----इन्फो
जिद्दीने तपास अन चोरट्याची पटविली ओळख
पंचवटी पोलीस ठाणे हद्दीत काही दिवसांपूर्वी घडलेल्या बुलेट चोरीचा तपास करताना पोलीस शिपाई मुख्तार शेख यांनी बारकाईने सीसीटीव्ही फुटेज तपासले. यामध्ये दिसणाऱ्या चोरट्याची ओळख तांत्रिक विश्लेषण शाखेच्या मदतीने त्यानी पटवली. मिळालेल्या सुगाव्यावरून शेख यांनी गोपनीय माहिती काढत चोरट्याचे लोकेशन नंदुरबारमध्ये असल्याची खात्री केली. याबाबत ची माहिती पोलीस निरीक्षक आनंदा वाघ यांना कळवीली. वाघ यांनी तात्काळ पथक तयार करुन नंदुरबार ला रवाना केले. तपास कौशल्य दाखवून सराईत चोरट्याला अटक करण्यास यश मिळविल्याबद्दल शेख यांना पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी प्रशस्तीपत्र देऊन गौरविले.