ओझर : येथील बाजारपेठ येथे असलेल्या मुलींच्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुले नं. १ व मुले नं. २ यांच्या स्वयंपाकगृहाची दयनीय अवस्था झाली असून, येथे उंदीर व घुशींचा सर्रास वावर असल्याची तक्रार करण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.ओझर येथे बाजारपेठेत जिल्हा परिषदेची कौलारू इमारत असून, सदर इमारत मुली नं. १ व मुली नं. २ यांच्यासाठी आहे परंतु हायवेलगत असलेल्या मुलांच्या शाळेची झालेली दुरवस्था पाहता त्यातील पाचशे विद्याथ्यांचे तात्पुरते स्थलांतर बाजारपेठेत झाले आहे. सदर शाळेत शासनाच्या नियमानुसारशालेय पोषण आहारात प्रत्येक विभागास एक स्वयंपाक खोली आहे. यात ज्या त्या विभागाला खिचडीसाठी स्वतंत्र खोलीदेखील आहे, परंतु सततच्या पावसाळ्यात शाळेत लागलेल्या गळतीमुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. येथील मुले नं. १ व २ च्या स्वयंपाक खोलीची दुरवस्था झाली आहे. पावसाचे पाणी हे खिचडीत गळत असल्याचीही तक्रार करण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सध्या ज्या खोलीत स्वयंपाक होतो ती पूर्वी वर्गखोली होती परंतु मुलांच्या शाळेचे झालेले स्थलांतर व जागेच्या उद्भवलेल्या प्रश्नामुळे यात दैनंदिन खिचडी बनविण्याचे काम केले जायचे, परंतु याच पक्क्या बांधकामाच्या खोल्यांची दुरवस्था झाली. छत गळण्याचे प्रमाण वाढले आहे. शेजारी असलेल्या घुशींचे व उंदराचे साम्राज्य फरशा फुटल्याने सगळीकडे माती साचली आहे. आजूबाजूच्या परिसरात घुशीची असलेली दहा पंधरा बिळे व तेथील सतत असलेली विद्यार्थ्यांची वर्दळ पाहता सदर प्रश्नी प्रशासन किती सुस्त आहे याचे चित्र दिसते. याबाबत प्रशासनाने त्वरित दुरुस्ती करून व उपाययोजना करण्याची गरज येथील पालक संघाने केली आहे.
शाळेत स्वयंपाकगृहाची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 12:13 AM