नाशिक : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा आणि फौजदारी प्रक्रिया कलम-१४४ लागू करण्यात आला आहे. याअंतर्गत कुठल्याहीप्रकारचे समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम, सण, उत्सव, जत्रा, उरूस यासह कुठल्याही खासगी, सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येतील असे सर्व सोहळे आयोजित करण्यास मनाई असल्याचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी रविवारी (दि.२२) संध्याकाळी काढलेल्या आदेशात म्हटले आहे. हा मनाई आदेश येत्या ३१ मार्चपर्यंत लागू असणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध थेट कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.केंद्र व राज्य सरकारच्या आरोग्य मंत्रालयाकडून राज्यात कोरोना विषाणूचा फैलाव आटोक्यात आणण्याकरिता आणि जनतेच्या आरोग्याच्या हितासाठी तत्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्य राज्यमंत्री राजेश टोपे यांनी कलम-१४४ लागू झाल्याची घोषणा केली. यानंतर पोलीस प्रशसनाने तत्काळ कायद्याच्या अंमलबजावणीकरीता नागरिकांना गस्तीपथकावरील वाहनांद्वारे उद्घोषणा करत जमावबंदी आदेशाची माहिती देत पालन करण्याचे आवाहन केले. तसेच रविवारी रात्री नऊ ते सोमवारी पहाटे सहावाजेपर्यंत निर्गमित संचारबंदी (कर्फ्यू) कायम राहणार असल्याची सूचना दिली....या गोष्टींना मनाई* पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात खासगी, सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा पाचपेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येतील अशा सर्व प्रकारचे कृत्य, जसे कार्यशाळा, कॅम्प, प्रशिक्षण वर्ग, बैठका, मिरवणूक, मेळावे, सभा, आंदोलने, मोर्चे, देशांतर्गत व परदेशी सहली आदींचे आयोजनास पूर्णपणे मनाई.* सर्व दुकाने, सेवा, अस्थापना, उपहारगृहे, खाद्यगृहे, खानावळ, शॉपिंग सेंटर, मॉल्स, सुपरमार्केट, मनोरंजनाची सर्व ठिकाणे, क्लब, पब, क्रिडांगणे, मैदाने, जलतरण तलाव, उद्याने, जॉगिंग ट्रॅक, सिनेमागृहे, नाट्यगृहे, शाळा, महाविद्यालय, कोचिंग क्लासेस, व्यायामशाळा, संग्राहलये आदि बंद राहतील....यांना कलम-१४४ लागू नाही* शासकिय, निमशासकीय कार्यालये, सरकारी महामंडळाचे उपक्रम/अस्थापना, अत्यावश्यक सेवेतील व्यक्ती/रुग्णालये, पॅथॉलॉजी लॅबोरेटरी, दवाखाना, सर्व प्रकारची वैद्यकीय महाविद्यालये (अॅलोपॅथी, आयुर्वेदिक, होमिओपॅथी), नर्सिंग महाविद्यालये, रेल्वेस्थानक, बसस्थानक, विमानतळ, रिक्षा थांबे, बॅँक, विमा कार्यालये, पेट्रोलपंप.* पूर्वनियोजित लग्नसोहळे (कमाल ५० व्यक्तींपुरताच मर्यादित)* अंत्यविधी (कमाल ५० व्यक्तींपुरताच मर्यादित)*अत्यावश्यक किराणा सामान, दूध, दुग्धत्पादने, फळे, भाजीपाला, मेडिकल, जीवनावश्यक वस्तू विक्रीची ठिकाणे.*उपहारगृहांनी योग्य ती खबरदारी घेऊन खाद्यपदार्थ बनविणे आणि पार्सल स्वरुपात काउंटरद्वारे विक्री .* सर्व हॉटेल, लॉज यांना तेथे वास्तव्यास असलेल्या ग्राहकांना आरोग्यविषयक आवश्यक ती खबरदारी घेऊन रेस्टॉरंटमधून खाद्यपदार्थ बनवून देण्याची परवानगी.* ज्या अस्थापना (माहिती तंत्रज्ञान उद्योग) यांच्याकडे देश, परदेशातील अतीमहत्त्वाच्या उपक्रमांची जबाबदारी आहे व सदर अस्थापना बंद राहिल्याने अशा उपक्रमांच्या प्रक्रियेला बाधा येऊ शकते असे संबंधित उपक्रम कार्यान्वित राहतील.* प्रसारमाध्यमांची ( सर्व दैनिके, नियतकालिके, टी.व्ही न्युज चॅनल इ.) कार्यालये.* घरपोहच मिळणा-या सेवा.सदर आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय दंडविधान संहिता कलम-१८८नुसार शिक्षेस पात्र ठरेल.
जाणून घ्या, असा आहे कलम-१४४; मनाई आदेश ३१ मार्चपर्यंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2020 9:33 PM
रविवारी रात्री नऊ ते सोमवारी पहाटे सहावाजेपर्यंत निर्गमित संचारबंदी (कर्फ्यू) कायम राहणार असल्याची सूचना दिली.
ठळक मुद्दे राज्यात कोरोना विषाणूचा फैलाव आटोक्यात आणण्याकरिता गस्तीपथकावरील वाहनांद्वारे उद्घोषणा करत जमावबंदी आदेशाची माहिती