नाशिक : भारतीय संस्कृती प्राचीन असून, दरवेळी ती नव्याने प्रकट होत असते. ज्ञान हेच या संस्कृतीचे अधिष्ठान असल्याने पुढील पिढीसाठी या संस्कृतीचे संवर्धन करणे आपण सर्वांचीच जबाबदारी असली पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांनी केले. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या आवारात झालेल्या २१व्या दीक्षांत सोहळ्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. भटकर बोलत होते. विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल सी. विद्यासागर राव, पालकमंत्री गिरीश महाजन, कुलसचिव प्रकाश अतकरे आणि विविध विद्याशाखांचे संचालक व्यासपीठावर होते. यावेळी राज्यपालांच्या हस्ते विविध विषयांत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. या सोहळ्यात ४० हून अधिक विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरव करण्यात आला. भारतीय संस्कृती ही अलौकिक पुरातन आणि तितकीच सनातन आहे. असे असूनही तिचे महत्त्व आजही अबाधित आहे. आपल्या संस्कृतीमध्ये तक्षशीला व नालंदा विद्यापीठ या प्राचीन विद्यापीठांचे मोठे योगदान आहे. देशामध्ये सातशेहून अधिक विद्यापीठे आहेत. त्यामध्ये यशवंतराव चव्हाण विद्यापीठाने आपले स्थान निर्माण केले आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातील विद्यापीठांना ‘डिजिटल युनिर्व्हर्सिटी’ म्हणून जेव्हढे काम करता आले नाही तेव्हढी प्रगती मुक्त विद्यापीठाने केली असल्याचे गौरवोद्गार भटकर यांनी काढले. या विद्यापीठाच्या प्रगतीसाठी आजवरच्या सर्व कुलगुरुंचे प्रयत्न मोलाचे ठरले आहे. प्रथम कुलगुरू डॉ. राम ताकवले यांनी या क्षेत्रात केलेले काम महत्त्वाचे आहे. त्यांचे योगदान विसरून चालणार नाही, असेही ते म्हणाले. विद्यापीठाचा कार्यविस्तार आणि अभ्यासक्रमांची व्याप्ती पाहता विद्यापीठ हे जगातील मेगा युनिर्व्हर्सिटी म्हणून नावारूपास येईल यासाठी विद्यापीठाचे काम आणि कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांचे प्रयत्न पथदर्शी ठरतील, असे डॉ. भटकर म्हणाले. यावेळी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्यासह कुलगुरू, विद्याशाखांचे संचालक दीक्षांत मिरवणुकीने कार्यक्रमस्थळी आले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी प्रास्ताविक केले. विद्यापीठाकडून १२४ अभ्यासक्रम शिकविले जातात त्यामधून सुमारे पावणेतीन लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यापीठाने उद्योग-शिक्षण असे धोरण डोळ्यासमोर ठेवून अभ्यासक्रमाची निर्मिती केली असल्याचे सांगितले. विद्यापीठातून कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठीच्या उपाययोजना केल्या जात असून, अनेक संस्थांच्या मदतीने विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या रोजगाराचाही प्रश्न सोडविला असल्याचे यावेळी सांगितले. याप्रसंगी मानव्यविद्याशाखा, वाणिज्य विद्याशाखा, शिक्षणशास्त्र विद्याशाखा, कृषी विज्ञान विद्याशाखा, निरंतर विद्याशाखा, आरोग्य विद्याशाखा, शैक्षणिक सेवा विभाग आणि संगणक विज्ञान विद्याशाखेतील विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. यावेळी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्ष विजयश्री चुंबळे, आमदार सीमा हिरे, बाळासाहेब सानप, मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अरुण जामकर, डॉ. मो. स. गोसावी आदि मान्यवर उपस्थित होते. २७ हजार १९० पदविका, ९८ हजार ४२६ पदवी, ६ हजार ६९१ पदव्युत्तर पदवी आणि २० विद्यार्थ्यांना पीएच.डी पदवी प्रदान करण्यात आली. यावेळी राज्यपालांनी पदवीप्राप्त विद्यार्थ्यांना कर्तव्याची शपथ दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल चिकेरूर यांनी केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. (प्रतिनिधी)
ज्ञान हेच संस्कृतीचे अधिष्ठान
By admin | Published: January 31, 2015 12:46 AM