नाशिक : शिक्षक हे ज्ञानदान व नीतीमूल्याचे संस्कार करत समाजाची भावी पिढी घडविण्याचे कार्य करत असतात. पुस्तके ही ज्ञानाचे माध्यम असून, या पुस्तकांद्वारे शिक्षक ज्ञानदानाचे पवित्र कार्य करतात, असे प्रतिपादन राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष लेखक बाबा भांड यांनी केले.नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या वतीने परशुराम साईखेडकर नाट्यगृहात आयोजित आदर्श शिक्षक व शाळा पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी भांड बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, शालेय जीवनात माझ्यावर गुरुजनांमुळे झालेल्या वाचन संस्कारातूनच मी घडलो व लेखक झालो. आयुष्यात गुरुजन व पुस्तकांनी मला मोलाची साथ दिली. पुस्तकांमध्ये माणसाचे आयुष्य बदलवून टाकण्याचे सामर्थ्य असते. आयुष्याची काही वर्षे ज्ञानदानात घालविली. हा शिक्षकीपेशाचा कालखंड मला आयुष्यातील सर्वाधिक आनंद व समाधान देऊन गेला. याप्रसंगी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी प्रा. सूर्यकांत रहाळकर, उपाध्यक्ष प्रा. दिलीप फडके, चंद्रशेखर मोंढे, शशांक मदाने, श्रीरंग वैशंपायन, मीना बेंडाळे आदि मान्यवर उपस्थित होते.दरम्यान, आदर्श शाळा म्हणून पुरस्कार समितीने निवड केलेल्या संस्थेच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वेळुंजे गावातील माध्यमिक आश्रमशाळेला गौरविण्यात आले. तसेच आदर्श शिक्षक म्हणून गुरुवर्य ब. चिं सहस्त्रबुद्धे पुरस्काराने नवरचना विद्यालयाच्या निर्मल अष्टपुत्रे यांना गौरविण्यात आले. (प्रतिनिधी)
ज्ञानदान हे पवित्र कार्य
By admin | Published: October 19, 2015 10:13 PM