सिन्नर : गेल्या लोकसभा निवडणुकीत बंडखोरी करणारे भाजपचे माणिकराव कोकाटे यांनी सिन्नर विधानसभा मतदारसंघात मंगळवारी (दि. १) अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने रंगत वाढली आहे.गेल्या विधानसभा निवडणुकीत माणिकराव कोकाटे यांनी भाजपकडून उमेदवारी केली होती. त्यावेळी शिवसेनेचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यानंतर कोकाटे यांनी चार वर्षे भाजपत काम केले. या काळात त्यांची कन्या भाजपकडून भरतपूर जिल्हा परिषद गटात विजयी झाल्या. दरम्यान, गेल्या लोकसभा निवडणुकीत माणिकराव कोकाटे यांनी भाजपत बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी केली होती. भाजपने त्यानंतर त्यांची पक्षातून हकालपट्टीही केली. तेव्हापासून माणिकराव कोकाटे कोणत्याच पक्षात सक्रिय नव्हते. आता विधानसभा निवडणुकीत सिन्नर मतदारसंघात शिवसेनेने विद्यमान आमदारांना उमेदवारी जाहीर करण्यासह एबी फॉर्म दिला आहे. त्यामुळे सिन्नरची जागा शिवसेनेकडेच असल्याचे निश्चित झाले आहे. असे असतानाही कोकाटे यांच्या जि.प. सदस्य असलेल्या कन्येने उमेदवारी अर्जावर पक्ष म्हणून भाजपचा उल्लेख केल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. युतीमध्ये सदर जागा शिवसेनेला सोडण्यात येऊनही भाजपच्या नावावर अर्ज दाखल करण्यात आल्याने भाजपकडून त्यावर काय आक्षेप घेतला जातो, याकडे आता लक्ष लागून असणार आहे. दरम्यान, कोकाटे यांच्या अपक्ष उमेदवारीने मतदारसंघात निवडणुकीत रंगत वाढण्याची चिन्हे आहेत.
कोकाटेंच्या अपक्ष उमेदवारीने सिन्नर मतदारसंघात रंगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2019 1:26 AM