नाशिक : लोकसभा निवडणुकीत नाशिक आणि दिंडोरीमधील बंड शमविण्यासाठी आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच लक्ष घातले असून, माणिकराव कोकाटे यांना राज्यसभा आणि हरिश्चंद्र चव्हाण यांना कळवण-सुरगाणा मतदारसंघातून विधानसभेची उमेदवारी देऊ केली आहे. माघारीचा निर्णय आता उभयतांनाच घ्यायचा असून, त्यावर त्यांचे भाजपातील भवितव्य ठरणार आहे.लोकसभा निवडणुकीसाठी माणिकराव कोकाटे आणि हरिश्चंद्र चव्हाण या दोघांनीही तयारी केली होती. हरिश्चंद्र चव्हाण यांनी तर आपल्या मतदारसंघातून तीन वेळा निवडून येण्याची हॅटट्रिक केली असल्याने विद्यमान खासदार म्हणून त्यांना पुन्हा संधी मिळेल अशी खात्री होती. मात्र लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नाट्यमय घडामोडी घडल्या. शिवसेनेचे माजी आमदार धनराज महाले यांनी राष्ट्रवादीमध्ये शिरकाव करून तिकीट मिळविले, त्यामुळे राष्ट्रवादीकडून संभाव्य उमेदवार असलेल्या भारती पवार यांनी भाजपात प्रवेश करून उमेदवारी मिळविली त्यामुळे हरिश्चंद्र चव्हाण कमालीचे नाराज असून, त्यांनी बंडाचे निशाण फडकविण्याची तयारी दर्शविली आहे.दुसरीकडे भाजपा लोकसभा निवडणूक स्वबळावर लढणार म्हणून माणिकराव कोकाटे यांनी तयारी केली, पण ऐनवेळी भाजपा शिवसेनेची युती झाल्याने माणिकरावांची अडचण झाली असून, त्यांनीदेखील बंडखोरीची तयारी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे.लोकसभा निवडणूक अटीतटीची होत आहे. अशा वेळी प्रत्येक जागा महत्त्वाची असल्याने आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील बंड शमविण्यासाठी प्रयत्न चालविले असून, इच्छुक उमेदवारांना विविध मार्गाने माघार घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
कोकाटे यांना राज्यसभा, हरिश्चंद्र चव्हाण यांना विधानसभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2019 1:36 AM