पंचवटी : शुक्रवारी (दि.12) दुपारी दोन वाजेच्या सुमारास वारा व विजांच्या कडकडाटासह बळीराजाने दमदारपणे हजेरी लावल्याने शेकडो नागरिकांची त्रेधा उडाली. शुक्रवारी सकाळपासूनच नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत होता. त्यातच दुपारच्या सुमारास झालेल्या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीकाळ दिलासा मिळाला.दुपारी पावसाने हजेरी लावल्यानंतर रस्त्यावरची वर्दळ पुर्णपणे ठप्प झाली होती. तर पावसामुळे परिसरातील रस्ते काहीकाळ ओस पडल्याचे चित्र दिसून आले. मान्सूनचे आगमन झाल्यानंतर महाराष्ट्रात पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता वेधशाळेने वर्तविली होती . त्यानुसार शुक्रवारी दुपारच्या सुमारास वाऱ्यासह विजांचा कडकडाट सुरु झाला व त्यानंतर तासभर पाऊस सुरू होता. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची धावपळ झाली तर बाजारपेठेत विविध वस्तू खरेदीसाठी गेलेल्या नागरिकांची त्रेधा उडाली. पावसामुळे भरगच्च झालेली बाजारपेठ काहीकाळ ओस पडली होती काही भागातील रस्त्यावर पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचल्याने परिसरातील रस्ते जलमय झाले होते तर सखल भागातील रस्त्यांना तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते. पंचवटीतील हिरावाडीरोड, जुना आडगाव नाका, गणेशवाडी भाजी मंडई रस्ता, दिंडोरीरोड, गजानन चौक, अयोध्यानगरी, भागातील अनेक रस्त्यांवर पावसाचे पाणी साचल्यामुळे रस्तेजलमय झालेले दिसून आले.