त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील कळमुस्ते गाव अद्यापही विकासापासून कोसो दूर आहे. या गावाला जोडणारे रस्ते पाणी योजना, शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र आदी सुविधांची वानवा आहे. परिसरात पर्यटनाला तसेच वनसंवर्धनाला चांगला वाव असतानाही प्रशासनासह लोकप्रतिनिधींचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे.त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सापगाव ते कळमुस्ते रस्ता कित्येक वर्षांपासून दुरुस्त केला नसून रस्त्यावर निघालेली खडी, कच वाहने घसरण्यास कारणीभूत ठरत आहेत. त्यामुळे या रस्त्याने वाहनधारक ये-जा करणे टाळताना दिसून येतात. बऱ्याचदा गंभीर आजारी रुग्णांना या रस्त्यावरून नेणे कसरतीचे होऊन बसते. गावात जायला धड रस्ताच नसल्याने रुग्णवाहिकाही गावापर्यंत जाऊन पोहोचू शकत नाही. रस्त्याला ठिकठिकाणी असलेले जागीच घातक वळणे, जागोजागी पडलेले मोठमोठे खड्डे, निघालेली खडी व कच यामुळे या रस्त्यावरून मार्गक्रमण करणे म्हणजे अपघाताला निमंंत्रण देण्यासारखे आहे. दुचाकी तर या रस्त्यांवरून जाऊच शकत नाही. कळमुस्ते गावाच्या परिसरात सापगाव, काचुर्ली, जांभुळवाडी, हर्षवाडी, उभरांडे आदी विकासापासून वंचित असलेली आदिवासी पाडे आहेत. याठिकाणी एप्रिलमध्ये पाणीटंचाई जाणवायला सुरुवात होते. लोकप्रतिनिधी येऊन फक्त आश्वासने देतात; परंतु कृती होताना दिसून येत नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.गावामुळे पर्यटनवाढीला चांगला वाव आहे. किल्ला हरिहर गडाच्या पायथ्याशीच हर्षवाडी आहे. गडाचे संरक्षण संवर्धन करण्याचे काम हर्षवाडीकर करतात. त्यांच्या कामगिरीची वनविभागानेही घेतलेली आहे. त्यामुळे याठिकाणी पर्यटनवाढीच्या दृष्टीने सोयीसुविधा पुरविणे गरजेचे आहे. कळमुस्ते हर्षवाडी ते निरगुड पाडा रस्त्याचे खडीकरण झाले आहे. सापगाव, कळमुस्ते ते हर्षवाडीमार्गे निरगुड पाडा रस्ता राज्य महामार्ग क्रमांक २१ला जोडला तर हर्षवाडी हरिहर किल्ल्यावर दोन्हीही बाजूने पर्यटक जाऊ शकतील.
कळमुस्ते विकासापासून कोसो दूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 9:02 PM
कळमुस्ते गाव अद्यापही विकासापासून कोसो दूर आहे. या गावाला जोडणारे रस्ते पाणी योजना, शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र आदी सुविधांची वानवा आहे. परिसरात पर्यटनाला तसेच वनसंवर्धनाला चांगला वाव असतानाही प्रशासनासह लोकप्रतिनिधींचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे.
ठळक मुद्देदुर्लक्षित : गावात सोयी-सुविधांचा अभाव