नाशिक : जिल्ह्यातील ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत चालला असून, रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ व रुग्ण सापडण्याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणावर कमी झाले असले तरी, देशपातळीवर कोरोनाची पुन्हा तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कोरोना केअर सेंटर तूर्तास कायम कार्यान्वित ठेवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. कपिल आहेर यांनी दिली आहे. जिल्ह्यात गेल्या वर्षी कोरोनाने सर्व प्रथम ग्रामीण भागातून शिरकाव केला, तेव्हापासून आरोग्य यंत्रणा कार्यन्वित झाली असून, घटना व्यवस्थापक असलेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी कोरोनाची प्राथमिक लक्षणे असलेल्या संशयित रुग्णांसाठी कोरोना केअर सेंटर सुरू केले होते. या सेंटरमध्ये संशयित रुग्णांना दाखल करून त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले गेले. कमी लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी कोविड सेंटर वरदान ठरले. हजारो रुग्ण यातून बरे होऊन घरी सोडण्यात आले. आजमितीला ग्रामीण भागात २९ कोविड सेंटर कार्यान्वित असून, या ठिकाणी वैद्यकीय पथके तैनात आहेत. मात्र गेल्या १५ दिवसांपासून रुग्ण बरे होण्याच्या व पुन्हा नव्याने रुग्ण येण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे सध्या सुमारे २ हजारांच्या आसपास रुग्ण विविध कोविड सेंटरमध्ये दाखल आहेत. त्यांच्या प्रकृतीतही कमालीची सुधारण होत असून, काही सेंटरमध्ये रुग्णच नसल्याचे आढळून आले आहे. तथापि, देशपातळीवर कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त करून त्यासाठी आतापासूनच तयारी करण्याच्या सूचना आरोग्य विभागाला देण्यात आल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील कोविड सेंटरची व्यवस्था कायम ठेवण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने घेतला आहे.
तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून आरोग्य विभागाने वैद्यकीय अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणाचा कार्यक्रम हाती घेतला असून, तिसऱ्या लाटेत रुग्ण संख्या कशी प्रमाणात वाढेल याचा अभ्यास करून त्यादृष्टीने कोविड सेंटरमध्ये तयारी करण्याचे ठरविले आहे. कोविड सेंटर बरोबरच डेडीकेटेड कोविड हॉस्पिटलमधील तयारीदेखील तशीच कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तिसऱ्या लाटेसाठी आरोग्य विभाग सज्ज असल्याची माहितीही डॉ. कपिल आहेर यांनी दिली आहे.