सिडको : छावा संघटनेचा पदाधिकारी असल्याचा बनाव करीत सिडकोतील एका रुग्णालयामध्ये जाऊन महिला डॉक्टरचा विनयभंग केल्याप्रकरणी अंबड पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश दिलीप पाटील (२४, रा. संजय राका चौक, सिंहस्थ नगर, सिडको), विजय प्रकाश कुमावत (२५, रा. शिवाजीनगर, कृष्ण मंदिराजवळ, सातपूर), सुनील बबन सदगीर (२३, रा. सिंहस्थ नगर, सिडको), विशाल बाबू जाधव (२३, रा. तुळसी सिटी राजगृह एफ ३०४ बदलापूर पूर्व, तालुका कल्याण, जिल्हा ठाणे) यांनी नवीन नाशकातील एका कोविड रुग्णालयात जाऊन भांडण केले. यातील योगेश पाटील याने मी छावा संघटनेचा जिल्हाध्यक्ष असल्याचे व विशाल जाधव याने टायगर ग्रुपचा अध्यक्ष असल्याचे सांगत व तुमच्या येथे बाल कामगार काम करतात, अशी कुरापत काढत कोविड रुग्णालयांमधील महिला डॉक्टरचा विनयभंग केला. तसेच विनामास्क शिवीगाळ करून गैरवर्तन केले. या प्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, चारही संशयितांवर विनयभंगाचा व कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी चारही संशयितांना अटक करून न्यायालयात हजर केले असून, त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या प्रकरणी पुढील तपास गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक कमलाकर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कैलास सोनवणे, पोलीस शिपाई दीपक वाणी करीत आहेत. दरम्यान, पाटील याचा छावा संघटनेशी कुठल्याही प्रकारचा संबंध नसल्याचे संघटनेच्या सूत्रांनी सांगितले.