सटाणा : बागलाण तालुक्यात वैद्यकीय सुविधांअभावी कोरोनाबाधित रुग्णांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत असल्याची तक्रार केल्यानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी त्याची गंभीर दखल घेत तात्काळ ताहाराबाद प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड रुग्णालय सुरू करण्यास मान्यता दिली असल्याची माहिती बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांनी दिली. यामुळे आदिवासी भागातील रुग्णांची गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे. बागलाण तालुक्यात कोरोनाने अक्षरशः थैमान घातले आहे. पंधरा दिवसांतच कोरोनाबाधित रुग्णसंख्येचा आकडा दोन हजार पार झाला आहे, तर १२० पेक्षा अधिक रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला. कोरोनाच्या वाढती रुग्णसंख्येच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचा दर अत्यंत कमी आहे. त्यामुळे अपुरी बेडसंख्या आणि ऑक्सिजनचा तुटवडा यामुळे गरीब रुग्णांची उपचाराअभावी मोठ्या प्रमाणात हेळसांड होत होती. काही रुग्णांना ऑक्सिजन न मिळाल्याने आपला जीव गमावण्याची वेळ आल्याचे आमदार दिलीप बोरसे यांनी जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी गंभीर दखल घेत गुरुवारी (दि.२९) ताहाराबाद प्राथमिक आरोग्य केंद्रात ३० बेडचे कोविड रुग्णालय सुरू करण्यास मान्यता दिली आहे.
कोट....
रुग्णालयात ३० बेडला ऑक्सिजनची सुविधा राहणार आहे. वाढीव बेड संख्येमुळे मुल्हेर, अलियाबाद, साल्हेर या आदिवासी, तसेच ताहाराबाद, अंतापूर, करंजाड, पिंपळकोठे, सोमपूर परिसरातील रुग्णांची सोय मोठी सोय होणार आहे.
- दिलीप बोरसे, आमदार