चांदवड : येथील उपजिल्हा रुग्णालयातील मुख्य इमारतीमध्ये कोरोना रुग्णांसाठी जास्तीच्या ५० खाटांची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र सद्यस्थितीत चांदवड तालुक्यातील कोरोना रुग्ण संख्या कमी झाल्याने उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारातील कोविड सेंटरमध्ये अवघे नऊ रुग्ण उपचार घेत आहेत. रुग्णालयात आता अन्य आजारांवरील उपचारांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. चांदवड तालुक्यात दुसऱ्या लाटेतील रुग्णसंख्या २६९ इतकी आहे. त्यामुळे सध्या मुख्य इमारतीमधील सर्व रुग्ण आता उपजिल्हा रुग्णालयाच्या शेजारीच असलेल्या ट्रामा केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात येत आहेत. येथे तीस खाटांची सोय असून, चांदवड उपजिल्हा रुग्णालयात इतर रुग्णांसाठी पूर्ववत औषधोपचार सुरू होईल, अशी माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुशीलकुमार शिंदे यांनी दिली. आता उपजिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटर बंद करण्यात आले असून, येथील रुग्णांना ट्रामा केअर सेंटर मध्येच सुविधा दिली जाणार आहे. तसेच ट्रामा केअर सेंटर या इमारतीतील कोविड सेंटरमध्ये तीस खाटांची सोय आहे. उपजिल्हा रुग्णालयातील इमारतीची औषध फवारणी करून हे रुग्णालय सर्वसाधारण आजारासाठीच्या रुग्णासाठी सुरू करण्यात आले आहे. याकरिता नागरिकांनी याठिकाणी उपचारासाठी यावे असे आवाहन डॉ. सुशीलकुमार शिंदे यांनी केले.
चांदवड रुग्णालयातील कोविड कक्ष बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 5:19 PM