नाशिक : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सादर झालेल्या ‘क्रांतिसूर्य’ या बहारदार हिंदी नाट्यप्रयोगाने तब्बल नऊ महिन्यांनतर कालिदास कलामंदिराचा पडदा उघडला. या नाट्यप्रयोगापूर्वी मान्यवरांच्या उपस्थितीत ‘मी सावित्री’चे फलक हातात घेऊन भव्य बाईक रॅली काढून सावित्रीबाईंच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महात्मा जोतिबा व सावित्रीबाई फुले यांनी केलेली समाजसुधारणा व मागासवर्गीय समाजातील मुलींना शिक्षण देताना किती अडचणींवर कशी मात करावी लागली, या विषयावरील नाटक हिंदी भाषेत सादर करण्यात आले. या नाट्य सादरीकरणापूर्वी भव्य रॅली काढण्यात आली. त्यात नाशिकच्या विविध क्षेत्रातील महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. यावेळी आमदार देवयानी फरांदे, माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, समीना मेमन, आशा कटारे, वैशाली नाईकवाडे, अनघा धोडपकर, विजय राऊत, बाजीराव तिडके, सी. एम. सैनी, नीलेश खैरे, कल्पना कुटे, अनंता सूर्यवंशी, राजेश शर्मा, संतोष कमोद, शशी हिरवे, उत्तम आंबे, संजय गिते, चंद्रकांत बागूल आणि सूत्रधार योगेश कमोद आदी पदाधिकारी उपस्थित होते. आमदार फरांदे यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई आणि क्रांतिसूर्य जोतीराव फुले यांच्यामुळेच आम्ही सर्व महिला शिक्षण घेऊन इथपर्यंत पोहोचू शकलो, असे सांगितले. तर डाॅ. बच्छाव यांनी फुले दाम्पत्याने अनंत यातना सोसूनही महिलांना शिक्षणाचे व्दार खुले केल्याने संपूर्ण समाज आणि महिलांवर त्यांचे खूप मोठे ऋण असल्याचे सांगितले.
राजेश शर्मा लिखित आणि दिग्दर्शित या नाटकात नाशिकच्या ४० कलावंतांनी फुले दाम्पत्याच्या कार्याचा आलेख मांडला. कार्यक्रमाचे सूत्रधार म्हणून योगेश कमोद यांनी कामकाज पाहिले.
फोटो
८५
क्रांतिसूर्य नाटकातील एका प्रसंगात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि क्रांतिसूर्य जोतिबा फुले.
९६
‘मी सावित्री’चे फलक हाती घेऊन महिलांनी काढलेली बाईक रॅली.