इंदिरानगर : कलानगर येथील कृष्णकांत भाजीबाजार चिखलागत हरविला आहे. त्यामुळे आणि सडका भाजीपाला तेथेच फेकून देण्यात येत असल्याने परिसरास बकालस्वरूप प्राप्त झाले आहे. तातडीने मुरूम टाकून आरोग्याचा प्रश्न सोडविण्याची मागणी होत आहे.सुमारे १५ वर्षांपूर्वी रथचक्र चौकात आणि परिसरातील रस्त्यावरच भाजीविक्रेते बसत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन लहान-मोठे अपघात घडत होते. त्याची दखल घेत महापालिकेच्या वतीने कलानगर येथे कृष्णकांत भाजीबाजार तयार करण्यात आला. यामुळे सुमारे ५० ते ६० भाजीविक्रेते बसतील असे सीमेंट काँक्रिटचे ओटे बांधण्यात आले. तसेच ऊन व पावसापासून बचाव होण्यासाठी पत्र्याचे शेड टाकण्यात आले. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ही करण्यात आली. त्या ठिकाणी सध्या सुमारे ३० ते ४० भाजीविक्रेते बसतात. सायंकाळी मोठ्या प्रमाणात ग्राहकांची गर्दी होते, परंतु भाजीबाजारात पावसामुळे चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. पावसाच्या पाण्याचे लहान-मोठे डबके आणि काही भाजीविक्रेते नको असलेला भाजीपाला बाजारात टाकत असल्याने घाण व दुर्गंधीला सामोरे जावे लागत आहे. भाजीबाजाराच्या चारही बाजूंनी लोकवस्ती असल्याने त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सुमारे १५ वर्षांपासून भाजीबाजाराची कोणत्याही प्रकारची देखभालीअभावी दुरवस्था होत चालली आहे. (वार्ताहर)
कृष्णकांत भाजीबाजार हरविला चिखलात
By admin | Published: August 08, 2016 12:49 AM