नाशिक : समाजात राहत असताना आपण समाजाचे काही देणे लागतो या सामाजिक बांधिलकीतून आपले जीवन आपण स्वत: घडविले पाहिजे. या प्रक्रियेत आपल्याला जे अनुभव येतात तेच खरे शिक्षण, असे प्रतिपादन ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक वासंती सोर यांनी केले. रावसाहेब थोरात सभागृहात के.टी.एच.एम. महाविद्यालयाच्या वृत्तपत्रविद्या व जनसंज्ञापन विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या डॉ. वसंत पवार व्याख्यानमालेत ‘चौकटीबाहेरचं जगणं’ या विषयांतर्गत दुसरे पुष्प गुंफताना त्या बोलत होत्या. वर्ध्याच्या गांधी महिला आश्रमात बालपणी आम्हाला स्वावलंबनाचे धडे मिळाले. कापूस वेचण्यापासून वस्त्र विणण्यापर्यंतचे धडे तेथे आम्हाला मिळाले. तसेच विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीतील सहभाग हे चौकटीबाहेरचे जगण्याचा अनुभव घेतल्याने याची जाणीव असल्याचेही सोर यांनी यावेळी सांगितले. अध्यक्षीय भाषणात जिल्हा परिषद अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांनी अध्यक्षीय भाषणात डॉ. वसंत पवार यांच्या कार्याच्या स्मृतींना उजाळा दिला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन डॉ. डी. पी. पवार यांनी व आभार प्रा. प्राची पिसोळकर यांनी केले. (प्रतिनिधी)
के.टी.एच.एम. महाविद्यालयाच्या वतीने व्याख्यान
By admin | Published: February 04, 2015 1:57 AM