नाशिक : पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने कुलभूषण जाधव यांना सुनावलेली फाशीची शिक्षा अन्यायकारक असून, हा हत्येच्या नियोजनाचा प्रकार आहे. पाकिस्तानच्या या कृत्याचा भारत पूर्णपणे निषेध करतो. भारताला शांतता हवी आहे, परंतु पाककडून अशाप्रकारचे कृत्य सुरूच राहणार असतील शांततेचे प्रयत्न यशस्वी होऊ शकणार नाही, अशा शब्दात केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी पाकिस्तानला ठणकावले आहे.पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत शहरात आडगाव येथे म्हाडाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या घरकुल योजनेच्या भूमिपुजन सोहळ्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी पाकीस्तानाच्या अन्यायावर कठोर टीका केली.पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावल्यामुळे संपूर्ण देशभरात आक्रोश व्यक्त होत आहे. पाकिस्तानने जाधव यांना फाशीची शिक्षा जाहीर केल्यापासून भारत सरकार जाधव यांच्या सुटकेसाठी पाठपुरावा करीत असून, त्यासाठी आंतरराष्ट्रीय दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं, सांगत त्यांना सोडवण्यासाठी भारत सरकारचे सर्व स्तरावर प्रयत्न सुरू असल्याचे भामरे यांनी स्पष्ट केले. कुलभूषण जाधव रॉ एजंट नाही, त्यांची अटक चुकीची करण्यात आल्याचे सांगतानाच पाकिस्तानने याबाबतचे कोणतेही पुरावे दिलेले नाही. त्यामुळे कुलभूषण जाधव यांना सुनावलेली फाशीची शिक्षा अन्यायकारक असून, भारत हे कदापि सहन करणार नसल्याचे स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
कुलभूषण जाधव रॉ एजंट नाहीच
By admin | Published: April 15, 2017 12:59 AM