नाशिक : केंद्र शासनाच्या मनुष्यबळ विकास मंत्रालय संचलित महर्षी सान्दीपनी राष्टय विद्या प्रतिष्ठानच्या वतीने घेण्यात आलेल्या शुक्ल यजुर्वेद माध्यंदिन शाखेच्या अभ्यासक्रमाच्या कण्ठगत परीक्षेत वेदभूषण घनश्याम किशोर कुलकर्णी देशात प्रथम आला आहे, तर सौरभ सुधीर पाठक याने द्वितीय क्रमांक पटकावला आहे. या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर. हे विद्यार्थी शंकराचार्य गोदावरी प्रतिष्ठानचे विद्यार्थी असून, अन्य सात विद्यार्थीही उर्त्तीण झाले आहेत. वेदमूर्ती रवींद्रशास्त्री पैठणे (गुरुजी) यांनी त्यांना मार्गदर्शन केले. या दोघा गुणवंतांचा सत्कार नुकताच कांची कामकोटी पीठाधीश्वर श्री शंकर विजयेंद्र सरस्वती महाराज यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन करण्यात आला. वेद खिलो धर्ममूलम या सूत्रानुसार धर्मरक्षा व पुनरुत्थानासाठी वेद कटिबध्द आहेत. किंबहुना लोककल्याणासाठीच वेदांची निर्मिती आहे. मनुष्यमात्राचा जीवनावरील विश्वास वाढवण्यासाठीच वेदांचे जतन, संवर्धन करणे आवश्यक आहे, असे मत शंकराचार्यांनी व्यक्त केले. यावेळी पैठणे, ज्येष्ठ पत्रकार विश्वास देवकर, प्रतिष्ठानचे उपप्राचार्य वेदमूर्ती गोविंदशास्त्री पैठणे, कांची कामकोटी पीठाचे विश्वनाथन अय्यर, बी. श्रीधर, सुंदरेशन अग्नि, जानकी रामन, स्वामिनाथन, विजय मेहता, भरणीधरन आदी उपस्थित होते.
वेद परीक्षेत नाशिकचा कुलकर्णी देशात प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 12:44 AM