त्र्यंबकेश्वर : त्रिपुरारी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर भगवान त्र्यंबक राजाच्या रथ मिरवणुकीस प्रशासनाने परवानगी नाकारल्याने पालखी मंदिरातून बाहेर देवस्थान वाद्यवृंदात बँडच्या तालात स्थानिकांच्या जयघोषात बाहेर काढण्यात आली. त्यानंतर त्र्यंबक राजाची मूर्ती रथामध्ये औपचारिकरीत्या ठेवण्यात आली.
यावेळी रथाची पूजा सरदार विंचूरकरांच्या वतीने त्यांचे पुरोहित रवींद्र अग्निहोत्री यांनी सकाळी पुण्याहवाचन लघुरुद्र पूजा ब्रह्मदेव पूजा आदी पूजा केल्या, तर रथ निघण्यापूर्वी रथाची पूजा त्यांनीच केली. त्यानंतर चार वाजून पन्नास मिनिटांनी प्रभू त्र्यंबक राजाची मूर्ती रथामधून पुन्हा उतरवून पालखीत ठेवण्यात आली आणि पालखी कुशावर्तावर नेण्यात आली. यावेळी लोकांनीही भगवान त्र्यंबक राजांच्या पालखी मार्गावर फुलांच्या सहाय्याने रांगोळी काढण्यात आली होती. लोकांनीही घरासमोर आकर्षक रांगोळ्या काढल्या होत्या. घराघरांवर विद्युत रोषणाई करण्यात आली होती. पालखीदरम्यान त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त दिलीप तुंगार, प्रशांत गायधनी, संतोष कदम, पवन भुतडा, तृप्ती धारणे आदी विश्वस्त उपस्थित होते, तर देवास पूजाविधी स्नान आरती पुष्पांजली होऊन देव पुनश्च परतीच्या मार्गाने येण्यासाठी पालखीत ठेवून देव परत त्र्यंबकेश्वर मंदिरात आणण्यात आले. या वेळी उपविभागीय पोलीस अधिकारी भीमाशंकर ढोले, सपोनि शिवचरण पांढरे, प्रभारी मेळा अधिकारी सपोनि कातकाडे, नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, निवासी नायब तहसीलदार रामकिसन राठोड व अन्य अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, दीपमाळेची पूजा त्र्यंबक देवस्थानचे अध्यक्ष न्या. एस. के. बोधनकर यांच्या हस्ते करण्यात आली. दिलीप रुईकर यांनी पौराहित्य केले. त्यानंतरच दीपमाळ पेटविण्यात आली.