धनंजय रिसोडकर, नाशिक : कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने ज्येष्ठ साहित्यिक कादंबरीकार आशा बगे यांना यंदाचा जनस्थान पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. अशा बगे यांच्या भूमी या कादंबरीला 2006 चा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झालेला आहे. त्यांच्या 7 कादंबऱ्या आणि 12 कथासंग्रह प्रसिद्ध आहेत.
नाशिकच्या कालिदास कला मंदिरात कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या स्मृतिदिनी अर्थात 10 मार्च ला सायंकाळी सहा वाजता या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. १ लाख रुपये आणि सन्मानचिन्ह, मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असून कुसुमाग्रज प्रतिष्ठाचे अध्यक्ष न्या नरेंद्र चपळगावकर यांच्या हस्ते हा सन्मान सोहळा होणार आहे.
आशा बगे यांचे बालपण नागपूर येथे गेले. त्यांचे वडील वकील होते. बगे यांचे मराठी साहित्य आणि संगीतात पदव्युत्तर शिक्षण झाले आहे. त्यांनी नोकरी न करता घरसंसार सांभाळून लेखनाचा छंद जोपासला. आशा बगे यांच्या लेखनाची सुरुवात ‘सत्यकथे’पासून झाली. त्यांची गाजलेली कथा ‘रुक्मिणी’ 1980 साली प्रसिद्ध झाली. मौजचे श्री.पु. भागवत आणि राम पटवर्धन यांनी मग आशा बगेंच्या लेखनशैलीला आकार दिला आणि नंतर मौज आणि बगे असे समीकरण जुळून गेले. मौजच्या दिवाळी अंकात नेमाने लेखन करणाऱ्या आशा बगे यांचा 2018 सालापर्यंतचा प्रकाशित ग्रंथसंभार 13 लघुकथासंग्रह, सात कादंबऱ्या, ललितलेखांची दोन पुस्तके असा व्यापक आहे.