नाशिक : ज्येष्ठ साहित्यिक आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष मधू मंगेश कर्णिक यांना यंदाचा प्रतिष्ठेचा ‘जनस्थान’ जाहीर करण्यात आला आहे. कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने दर दोन वर्षांनी दिल्या जाणाऱ्या या सन्मानाचे स्वरूप १ लाख रुपये, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे आहे. दरवर्षी हा सन्मान कुसुमाग्रजांच्या जयंतीला अर्थात २७ फेब्रुवारीला प्रदान केला जातो. मात्र, यंदा प्रथमच हा सन्मान १० मार्चला स्मृतिदिनी प्रदान केला जाणार असल्याचे निवड समितीचे अध्यक्ष ॲड. विलास लोणारी यांनी सांगितले.
कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांचे स्नेही पद्मश्री सन्मानप्राप्त मधू मंगेश कर्णिक हे कथाकार, कादंबरीकार, कवी, संवादलेखक म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला सुपरिचित आहेत. ज्येष्ठ कवी केशवसुत यांच्या मालगुंड येथील स्मारक उभारणीत मधू मंगेश कर्णिक यांचे मोठे योगदान आहे. १९९० रत्नागिरीत झालेल्या ६४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मानही त्यांना मिळाला असून, २०१४ ते २०१९ या काळात कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले होते. अनेक कथासंग्रहासह ‘करूळचा मुलगा’ हे त्यांचे आत्मचरित्रही प्रसिद्ध आहे.
इन्फो
माजी अध्यक्षांना प्रथमच ‘जनस्थान’
कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष असलेल्या कर्णिक यांना यंदाचा जनस्थान जाहीर झाल्याने, प्रथमच प्रतिष्ठानच्या एका माजी अध्यक्षास हा सन्मान दिला जाणार आहे. यापूर्वी विजय तेंडुलकर (१९९१), विंदा करंदीकर (१९९३), श्रीमती इंदिरा संत (१९९५), गंगाधर गाडगीळ (१९९७), व्यंकटेश माडगूळकर (१९९९), श्री. ना. पेंडसे (२०११), मंगेश पाडगावकर (२००३), नारायण सुर्वे (२००५), बाबूराव बागुल (२००७), ना. धों. महानोर (२००९), महेश एलकुंचवार (२०११), भालचंद्र नेमाडे ( २०१३), अरुण साधू (२०१५), विजया राजाध्यक्ष (२०१७), वसंत आबाजी डहाके (२०१९) यांना जनस्थान प्रदान करण्यात आला आहे.
इन्फो
गोदावरी गौरव २७ फेब्रुवारीला
कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे दर दोन वर्षांनी होणारा गोदावरी गौरव पुरस्कार सोहळा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी पुढे ढकलण्यात आला होता. ते पुरस्कार यंदा २७ फेब्रुवारीला प्रदान करण्यात येणार आहेत. त्यात डॉ. माधव गाडगीळ (विज्ञान), भगवान रामपुरे (शिल्प), श्रीगौरी सावंत (लोकसेवा), दर्शना जव्हेरी (नृत्य), सई परांजपे (चित्रपट), काका पवार (क्रीडा) यांचा सन्मान केला जाणार आहे.