सातपूर : सीआयआयच्या वतीने नाशिकला घेण्यात आलेल्या १४व्या राज्यस्तरीय कायझेन स्पर्धेत राज्यातील ७० सूक्ष्म, लघु, मध्यम आणि मोठ्या उद्योगातील ३०० स्पर्धक सहभागी झाले होते. वेगवेगळ्या पाच गटात ही स्पर्धा घेण्यात आली. विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.अंबड औद्योगिक वसाहतीतील नाशिक इंजिनिरिंग क्लस्टरच्या सभागृहात आयोजित १४व्या राज्यस्तरीय कायझेन स्पर्धेचे उद्घाटन सीआयआय उत्तर महाराष्ट्र विभागीय परिषदेचे अध्यक्ष तथा एबीबीचे उपाध्यक्ष गणेश कोठावदे यांच्या हस्ते करण्यात आले. स्वागत सीआयआय कायझेन अॅवॉर्ड कमिटीचे अध्यक्ष आणि महिंद्रा आणि महिंद्राचे महाव्यवस्थापक अनिल जंगले यांनी केले. जपानी व्यवस्थापन तत्त्वज्ञान असलेल्या कायझेनचा उपयोग निरंतर वाढत्या बदलांद्वारा गुणवत्ता सुधारण्यासाठी होत असतो. कायझेन शब्द म्हणजे ‘सतत सुधारणा’ बरेच उद्योग कायझेन तत्त्वज्ञानाचे अनुसरण करतात. प्रत्येक वर्षी कारखान्यांमध्ये कायझेनची ओळख पटविली जाते. त्याचा प्रचार आणि प्रसार केला जातो. त्यामुळे उद्योगाच्या वाढीस अनुकूल वातावरण तयार होण्यास मदत होते, असेही यावेळी सांगण्यात आले. १४ वर्षांपूर्वी ही स्पर्धा सुरू करण्यात आली आहे. या स्पर्धेत राज्यातील नाशिक, औरंगाबाद, मुंबई, ठाणे, अहमदनगर, पुणे, रायगड, कोल्हापूर आणि सातारा येथील विविध कारखान्यांतील संघ सहभागी झाले होते.
कायझेन स्पर्धकांना पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 1:21 AM