लासलगाव (नाशिक), दि. 30 - राज्यातील शेतकरी चांगले शेती उत्पादन घेतले असला तरी त्याच्या पदरी भाव मिळत नाही. त्यामुळे कांद्यासह अन्य शेतीमालाला ई मार्केट संकल्पनेत आणून नियोजनबद्ध पाणी, सोलरसह वीज व चांगल्या बाजारपेठेसाठी राज्यभर 50 कोल्ड स्टोरेजची शृंखला निर्माण करण्यात येत आहे. तसेच गोदावरी खोऱ्यात 28 टीएमसी शाश्वत पाणी देत मराठवाडा, खान्देश तसेच नाशिक, अहमदनगर यातील पाणी वाद मिटविण्याकरिता केंद्र सरकारकडून 12 हजार कोटींवर निधी आणला जाईल. जिल्ह्यातील येवला, सिन्नर व चांदवड या दुष्काळी तालुक्यांत 12 टीएमसी पाणी दिले जाणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
रेल्वेचे देशातील पहिल्या पाच कोटी रुपये खर्चाच्या अत्याधुनिक ओनियन कोल्ड स्टोरेजचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली व रेल्वेमंत्री सुरेश प्रभू हस्ते तसेच संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्यासह मंत्री महोदयांच्या उपस्थितीत रविवारी भूमिपूजन करून कोनशिलेचे अनावरण केले. त्याप्रसंगी फडणवीस बोलत होते.
सभेत गोंधळाचा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणात कृषी कर्जमाफीबद्दल येवला येथील संतू पाटील झांबरे यांच्यासह चार-पाच शेतकऱ्यांनी घोषणाबाजी केली. त्यामुळे पाच- दहा मिनिटे सभेत गोंधळ सुरू झाला. त्यावेळी फडणवीस यांनी भाषणातून जोरदार टोलेबाजी करीत आपल्या कार्यक्रमाचे वेळी मीडियाने लक्ष जावे व आपली छबी वाहिन्यांवर यावी म्हणून असा प्रकार केला जात आहे. ही स्टंटबाजी आहे. लोकांनी अशा लोकांकडे दुर्लक्ष करावे आणि टाळ्या वाजवून या अपप्रवृत्तीला विरोध करा, असे म्हणताच उपस्थित हजारो महिला पुरुषांनी प्रचंड प्रमाणात टाळ्या वाजवित साथ दिली. या वेळी शेतकरी घोषणाबाजी होत असताना जोरदार आवेशात भाषण करीत या घोषणा बाजीराव चोख प्रत्युत्तर देत आपल्या कुशल भाषण सामर्थ्याची चुणूक दाखवित सेवा अवघ्या पाच मिनिटांत नियंत्रण मिळवण्यात यश प्राप्त केले.