पंचवटी : शहरातील विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या चालक मालकांवर प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून करण्यात येणारी कारवाई अन्यायकारक असल्याचा आरोप करीत श्रमिक सेनेतर्फे प्रादेशिक परिवहन कार्यालयात आंदोलन करण्यात आले.यावेळी विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांनी कार्यालयाच्या प्रवेश द्वारावर ठिय्या मांडून प्रादेशिक परिवहन विभागाने सुरू केलेली कारवाई थांबवावी, अशी मागणी करीत घोषणाबाजी केली.श्रमिक सेनेचे अध्यक्ष सुनील बागुल यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी बागुल यांच्यासह पदाधिकारी व रिक्षाचालकांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांची भेट घेऊन निवेदन दिले. शालेय वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या परमिटची मुदत एक वर्ष ऐवजी तीन वर्ष करावी, स्पिड गव्हर्नन्स खर्च रिक्षा, टॅक्सी यांना न परवडणारा असल्याने स्पिड गव्हर्नन्स अट रद्द करावी, दंडाची रक्कम कमी करावी, विद्यार्थी वाहतूक करताना विद्यार्थी उतरवून गाडीवर कारवाई करू नये आदिंसह विविध मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष भगवान पाठक, वसीम शेख, कैलास बारवकर, शंकर बागुल, मामा राजवाडे, मनोज जाधव, सय्यद नवाज, पुरुषोत्तम पाथरे आदिंसह श्रमिक सेनेचे पदाधिकारी व चालक, मालक उपस्थित होते. (वार्ताहर )
श्रमिक सेनेचे आंदोलन
By admin | Published: September 09, 2016 1:10 AM