सातपूर : अंधेरी येथील ईएसआयसी हॉस्पिटलला आग लागून मृत्युमुखी पडलेल्या १० रुग्णांना प्रत्येकी २५ लाख, तर उर्वरित जखमींना अर्थसहाय्य करावे, अशी मागणी सीटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांनी केली आहे. सीटूचे नारायण, डॉ. रवि मदने व गंगाधर वरड यांनी रुग्णालयाला भेट देऊन माहिती घेतल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले. अंधेरीच्या ईएसआयसी रुग्णालयाची इमारत १९७७ मध्ये बांधण्यात आली आहे. नव्या बिल्डिंगचे काम २००९ पासून सुरू आहे व अध्यापही पूर्ण झालेले नाही. याला केंद्रीय कामगारमंत्री, ईएसआयसीचे वरिष्ठ अधिकारी जबाबदार आहेत. हे बांधकाम वेळेत पूर्ण झाले असते तर जीवितहानी झाली नसती. २०१० मध्ये व नंतरही या हॉस्पिटलमध्ये स्लॅब पडणे, आग लागणे असे अपघात झाले आहेत, परंतु प्रशासनाने लक्ष दिले नाही.या हॉस्पिटलमध्ये आग आटोक्यात आणण्याची यंत्रणा का नव्हती? बीएमसीने रजिस्ट्रेशन कसे केले. याबाबतही चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई करणे आवश्यक आहे. अशीच अवस्था नाशिक, औरंगाबाद व इतर हॉस्पिटलची आहे. त्याचा त्रास कामगार व जनतेला सहन करावा लागत आहे.सध्या ईएसआयसीकडे ७० हजार कोटीपेक्षा जास्त राखीव निधी पडून आहे. २०१७ मध्ये ईएसआयसीकडे १४ हजार कोटी रुपये जमा झालेत. त्यापैकी ७ हजार कोटीपेक्षा कमी रुपये वैद्यकीय सुविधांवर खर्च झाले. यावरून कामगारांचे उपचार व इतर लाभासाठी प्रचंड निधी असूनही सरकारला सक्षम यंत्रणा उभारता आली नाही. याला केंद्रीय मंत्री, राज्याचे मंत्री जबाबदार आहेत, असा आरोप डॉ. कराड यांनी केला आहे.गुन्हा दाखल करावाआगीची घटना व दहा रुग्णांचा मृत्यू का झाला याची चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करावा. मृतांच्या कुटुंबीयांना २५ लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी. ईएसआयसीच्या सर्व रुग्णालयांचे फायर आॅडिट करण्यात यावे. ईएसआयसी रुग्णालयात डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांची भरती करावी व सर्व रोगांवरील उपचाराची अद्ययावत यंत्रणा सुविधांसह उपलब्ध करण्यात यावी, या मागण्या करण्यात आल्या आहेत.
भरपूर निधी असूनही कामगार रुग्णालये दुर्लक्षित : कराड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 12:30 AM