निफाड : उसाच्या शेताला पाणी भरण्यासाठी गेलेल्या मजुरासमोर चक्क बिबट्या अवतरला. शेतमजुराच्या मागे लागल्याने पायात बळ आणून तो पळू लागला. याचवेळी या मजुराच्या वडिलांनी धाव घेत आरडाओरड केल्याने सदर बिबट्या माघारी फिरला व हे संकट टळले.
निफाड पंचायत समितीचे माजी सभापती सुभाष कराड यांच्या जळगाव येथील उसाच्या शेताला पाणी भरण्यासाठी त्यांच्याकडे काम करणारा शेतमजूर बुधवारी सकाळी गेला होता. तेथे हा थरारक प्रसंग घडला. अखेर घडलेली घटना त्यांनी कराड यांना कळवली. ही घटना वनविभागाला कळविण्यात आल्यानंतर वन विभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी बुधवारी कराड यांच्या शेतात पिंजरा लावला. गुरुवार, ८ जुलै रोजी पहाटेच्या सुमारास बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले. हा मादी बिबट्या दीड ते दोन वर्षांचा आहे. याच शेतपरिसरात अजून तीन बिबटे असल्याने वन विभागाने बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी गुरुवारी पिंजरा लावला. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास दुसऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यातही वन विभागाला यश आले आहे. हाही मादी बिबट्या दीड ते दोन वर्षांचा आहे. वन विभागाचे वनरक्षक सुनील महाले, वनसेवक भय्या शेख यांच्या पथकाने पिंजऱ्यात जेरबंद केलेल्या मादी बिबट्याला वनविभागाच्या वाहनाने निफाड येथील वन विभागाच्या रोपवाटिका केंद्रात आणले. या ठिकाणी तालुका लघुपशुवैद्यकीय सर्वचिकित्सालयाचे साहाय्यक आयुक्त डॉ. रवींद्र चांदोरे यांनी सदर बिबट्याची वैद्यकीय तपासणी केली.
---------------
शुक्रवारी सकाळी पिंजऱ्यात जेरबंद दुसऱ्या बिबट्याला पाहण्यासाठी शेतमजूर गेले असता या पिंजऱ्याच्या काही अंतरावर अजून दोन बिबटे उभे होते. ते बिबटे लगेच उसाच्या क्षेत्रात शिरल्याचे या मजुरांनी सांगितले. शुक्रवारी पुन्हा कराड यांच्या शेतात वन विभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला आहे. दोन दिवसांत दोन बिबटे जेरबंद झाल्याने जळगाव येथे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
(०९ निफाड बिबट्या)
090721\09nsk_21_09072021_13.jpg
०९ निफाड बिबट्या