सातपूर : येथील प्रभाग क्र मांक ९ मधील आयटीआय कॉलनी भागात महापालिकेकडून मूलभूत सुविधा पुरविल्या जात नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. या भागात नियमित घंटागाडी येत नाही. साफसफाई केली जात नाही. नाल्याच्या परिसरात मोठमोठी झाडे वाढलेली असून, या नाल्यामुळे डासांची उत्पत्ती होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या भागात कामगार कष्टकरी मोठ्या प्रमाणात वास्तव्याला आहेत. तसेच मोठमोठ्या इमारती (अपार्टमेंट) उदयास येत आहेत. त्याप्रमाणात समस्याही वाढत आहेत. पार्थ पॅलेस मागील माळी कॉलनी, आयटीआय कॉलनी परिसरात एकही सुसज्ज असे उद्यान नाही. मुलांना खेळण्यासाठी आणि विरंगुळ्यासाठी क्र ीडांगण नाही. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अभ्यासिका अथवा वाचनालय नाही, घंटागाडी नियमित येत नाही, अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे, नियमित साफसफाई होत नाही, डास निर्मूलन फवारणी केली जात नसल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे, पार्थ पॅलेसमागे नैसर्गिक नाला असून हा नाला बुजविण्यात आला आहे. बांधकामाचे रॅबिट नाल्याच्या कडेला आणून टाकले जाते, नाल्याच्या भागात मोठमोठी झाडे वाढलेली असल्याने याच ठिकाणी डासांची उत्पत्ती होत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
आयटीआय कॉलनी भागात सुविधांचा अभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 12:43 AM