नाशिक : झाकीर रूग्णालयाच्या ऑक्सिजन टाकीत गॅस भरताना घडलेल्या दुर्घटनेस पुरेशी काळजी न घेण्याबरोबरच, ऑक्सिजन सिलिंडरच्या टाकीची व्यवस्थित देखभाल, दुरूस्ती न करण्याची घटना कारणीभूत असल्याचे मत या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केले असून, ज्या ज्या खासगी रूग्णालयांनी ऑक्सिजन टाकीची क्षमता व वाढविता ऑक्सिजन बेडची संख्या वाढविली त्यांनी देखील या घटनेपासून बोध घ्यावा असा सल्लाही देण्यात आला आहे. महापालिकेच्या झाकीर रूग्णालयातील ऑक्सिजन टाकीत गॅस भरताना गळती होऊन ऑक्सिजन अभावी २२ जणांना प्राण गमवावे लागल्याची घटना घडल्याने काेरोनावर उपचार करणाऱ्या सर्वच शासकीय व खासगी रूग्णालयांच्या ऑक्सिजन टाकीच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय चौकशी समिती नेमण्याचा निर्णय शासनाने जाहीर केला असला तरी, रूग्णालयांना ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या खासगी कंपन्यांच्या संचालकांनी मात्र हा सारा प्रकार दुर्लक्षामुळे घडण्याची शक्यता नाकारलेली नाही. झाकीर रूग्णालयातील ऑक्सिजन टाकीची क्षमता व त्यात ऑक्सिजन भरणाऱ्या टँकरची पाईपलाईनची रूंदी याचा ताळमेळ नेहमीच बसलेला असावा. बहुतांशी वेळेस टाकीचा पाईप व टँकरच्या पाईप यांच्यात तफावत निर्माण होऊन गॅस भरण्यात अडचणी येतात. मुळात टँकरमधून गॅस भरताना त्याचा दाब प्रचंड क्षमतेचा असतो. त्यात कोणतीही वस्तू आडवी आली तर ती नष्ट किंवा तोडफोड होते. त्यामुळे टँकरमधून टाकीत गॅस भरताना या सर्व गोेष्टींची पुरेपूर काळजी व दक्षता घेणे गरजेचे असते. शिवाय अशा प्रकारची ज्या ज्या ठिकाणी सोय करण्यात आली आहे, त्या ऑक्सिजन टाकीची देखभाल, दुरूस्ती वेळोवेळी केली जाणे अपेक्षित आहे. त्यासाठी मुंबई व नागपूर येथे ‘पेसो’ विभाग असून, या विभागाकडून इन्स्पेक्शन होणेही गरजेचे आहे. झाकीर रूग्णालयातील दुर्घटनेत नेमका कोणता दोष निर्माण झाला हे समाेर आल्यावरच त्याचे निश्चित कारण स्पष्ट होऊ शकणार असल्याचेही पिनॅकल गॅस कंपनीचे संचालक अमोल जाधव यांनी सांगितले.
------
तर मोठ्या दुर्घटनेचा संभव
रूग्णालयांना पुरविण्यात येणाऱ्या ऑक्सिजनची गणना अति ज्वालाग्रही पदार्थात केली जाते. त्यामुळे झाकीर रूग्णालयातील गॅस गळतीच्या वेळी सुदैवाने कोणतीही ज्वालाग्राही वस्तू अथवा बिडी, सिगारेट तसेच ऑईलजन्य पदार्थ या गॅसच्या सानिध्यात न आल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.
-------
चौकट====
खासगी रूग्णालयांना सावधानतेचा इशारा
नाशिक शहरात तसेच जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढून रूग्ण संख्या वाढू लागल्याने रूग्णांवर उपचारासाठी अनेक खासगी व शासकीय रूग्णालयांनी ऑक्सिजनच्या बेडची संख्या वाढविली आहे. वीस बेडवरून तीस ते चाळीस बेड तयार केले असले तरी, ऑक्सिजन पुरविण्याच्या यंत्रणेची क्षमता मात्र जैसे थे ठेवण्यात आली आहे. त्यामुळे भविष्यात या यंत्रणेवरही ताण पडून दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.