नाशिक : अर्भके आणि लहान बाळांची रोगप्रतिकारक शक्ती ही प्रारंभी कमीच असते. मात्र, आईच्या दुधाने तसेच अन्य पौष्टीक आहाराने त्यांच्या प्रतिकारशक्तीत चांगली वाढ होणे अपेक्षित असते. मात्र, बालकांना दिल्या जाणाऱ्या जेवणातील सकस अन्नाचा अभाव सध्याच्या काळात अनेक बालकांमध्ये प्रतिकारशक्ती कमी करण्यास आणि आजारी पडण्याच्या अधिकच्या प्रमाणास कारणीभूत ठरत असल्याचे दिसून येते.
त्यामुळेच बालके पूर्वीच्या तुलनेत अधिक आजारी पडण्याचे, वारंवार उपचार करून घेण्याची वेळ पालकांवर येते. बहुतांश बालकांची ही घटती प्रतिकारशक्ती पालकांच्या आणि वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांच्या चिंतेचा विषय ठरते. बालपणी ऋतू बदलला की मुले आजारी पडतात. पहिल्या ४ वर्षांतल्या मुलांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते. मुलांना जेव्हा जंतूसंसर्ग होतो, तेव्हा त्यांची प्रतिकारशक्ती हळूहळू वाढायला सुरुवात होते. त्यामुळे ४ ते ५ वर्षांनंतर मुलांचं आजारी पडणे कमी होणे अपेक्षित असते. मात्र, सध्याच्या काळात बालकांचे आजारी पडण्याचे प्रमाण, त्यांना सातत्याने वैद्यकीय उपचार करावे लागत असल्याचे दिसून येते. जन्मापासून बाळाला ६ महिने केवळ स्तनपानत देणे बंधनकारक आहे. सहा महिन्यांनंतर बाळाला भाताची पेज, वरणाचे पाणी, मुगाची मऊ खिचडी असा पोषक आहार देणे अपेक्षित असते. त्यातूनच त्यांची प्रतिकारशक्ती वाढते. सुबत्ता असलेल्या घरांतून सर्व प्रकारची पथ्ये पाळून तसेच मुलांच्या आहारात प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या घटकांचा समावेश असूनही अशा घरांतील बालके अधिक आजारी पडतात, हा अधिक चिंतेचा विषय आहे.
कोट
बालके आजारी पडण्यामागे बाहेरच्या अन्नातून होणारे इन्फेक्शन, सकस आहाराचा अभाव, शुद्ध पाण्याचा अभाव, जंक फूड, थंड पेय, कृत्रिम रंग घातलेले पदार्थ हे या आजारांना कारणीभूत ठरणारे प्रमुख घटक आहेत. तसेच बदलते वातावरण, अपूर्ण आहार आणि बालकांमध्ये चलनवलन, व्यायामाचा अभाव यामुळे जंतूसंसर्ग वाढण्याच्या तक्रारीदेखील वाढल्या आहेत.
डॉ. नितीन मेहकरकर, बालरोग तज्ज्ञ