नाशिक : शहरात रविवारी (दि. ४) झालेल्या अतिवृष्टीनंतर सोमवारी पावसाचा जोर ओसरला असला तरी अनेक ठिकाणी वीज-पाणी नाही त्यातच अनेकांचे धनधान्य वाहून गेल्याने पूरग्रस्तांचे हाल होत आहेत. महापालिकेच्या अनेक भागांतील जलवाहिन्या फुटल्या तसेच पथदीप कोसळले असल्याने वीजपुरवठा खंडित आहे. विशेष म्हणजे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे तक्रारी करूनदेखील सुविधा पुरविल्या जात नसल्याच्या तक्रारी आहेत.रविवारी (दि.४) झालेली अतिवृष्टी तसेच पूर यामुळे जनजीवन विस्कळीत झाले, परंतु रहिवासी क्षेत्र आणि बाजारपेठांमध्ये पाणी शिरल्याने अनेकांना स्थलांतरित व्हावे लागले.जे नागरिक परिसरात राहत आहेत त्यांनादेखील मूलभूत सुविधा नसल्याने समस्यांचा सामना करावा लागला. शहरातील गोदाकाठी तसेच नासर्डी आणि वालदेवी काठी असलेल्या हजारो नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागला आहे. पुरामुळे अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाला आहेत. पथदीप किंवा विजेचे पोल वाकल्याने गंभीर स्थिती निर्माण झाली. आधीच पुराचे पाणी त्यात वीजपुरवठा खंडित अशा बिकट परिस्थितीत नागरिकांना राहावे लागले. परंतु त्याचप्रमाणे शहरात शेकडो मार्गांवरील वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना अंधारात मार्गक्रमण करावे लागत आहे. याबाबत नगरसेवकांनी मोठ्या प्रमाणात तक्रारी केल्या आहेत.शहरातील काही भागांत तर वीजपुरवठ्याबरोबरच जलवाहिन्यादेखील फुटल्या आहेत. त्यामुळे विजेबरोबरच पाणीपुरवठा नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे यासंदर्भात तातडीने सुधारणा करण्याची मागणी होत आहे. विशेष म्हणजे महापालिकेकडे याबाबत तक्रारी केल्यानंतरदेखील आपत्ती व्यवस्थापन विभागाने पाहणी केली नसल्याचे सांगण्यात आले.
पाणी, वीजपुरवठ्याअभावी हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2019 1:42 AM