नाशिक : विघ्नहर्त्या गणरायाच्या आगमनाची प्रतीक्षा संपली असून गुरुवारी शहरातील सार्वजनिक मंडळे आणि घरोघर श्रींची प्रतिष्ठापना होणार आहे. गणेशाच्या प्रतिष्ठापनेसाठी जय्यत तयारी सुरू झाली असून सार्वजनिक मंडळांनी शहर सजवले आहे. शुक्रवारी शहरात तिसरी पर्वणी असून त्यानिमित्ताने गुरुवारी शहराच्या विविध भागांत वाहतुकीस निर्बंध घातले जाण्याची शक्यता गृहीत धरून अनेक नागरिकांनी मात्र बुधवारीच गणरायाच्या मूर्ती वाजत गाजत घरी आणल्या आहेत.गणेशोत्सवाचे आगमन म्हणजे आनंदोत्सवच असतो. गेल्या वर्षी बाप्पाला निरोप देताना पुढील वर्षी लवकर या असे साकडे घालणारे सारेच गणेशभक्त नवीन वर्षात त्याच्या आगमनाची प्रतीक्षा करीत असतात. या उत्सवाची तयारी अगोदरच सुरू झाली असून गुरुवारी सार्वजनिक ठिकाणी आणि घरोघर श्रींची प्रतिष्ठापना होणार आहे. त्यासाठी बाजारपेठही सजली असून पत्री आणि कमळाच्या फुलापासून पूजा साहित्यापर्यंत आणि सजावटीच्या साहित्यापासून विद्युत रोषणाईपर्यंत साऱ्याच दुकानांमध्ये गर्दी झाली आहे. शहराच्या विविध भागात गणेश मूर्तींचे स्टॉल थाटण्यात आले असून त्याठिकाणी आपल्या लाडक्या गणपतीची विविध रूपे बघून त्यानुसार वेगळेपण असणारी मूर्ती खरेदी करण्यासाठी कुटुंबीय एकत्रितरीत्या येत होेते. यंदा प्लॅस्टर आॅफ पॅरिसपेक्षा शाडू मातीच्या मूर्तींचे दरही वाढले आहेत. बाजारपेठेत प्रतिष्ठापनेच्या दिवशी होणारी गर्दी आणि शुक्रवारच्या पर्वणीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या मध्यवस्तीत वाहतुकीवर येणारे निर्बंध यामुळे बुधवारीच अनेकांनी गणेश मूर्ती घरी नेल्या; मात्र बुधवारी बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी झाल्याने वाहतुकीची कोंडी होत होती. अनेक ठिकाणी तर नागरिकांना चालणे कठीण झाले होते. विशेषत: रविवार पेठ, रविवार कारंजा, भद्रकाली अशा ठिकाणी त्याचा प्रत्यय आला. याशिवाय कॉलेजरोड, मुंबई नाका, काठे गल्ली या परिसरात गणेश मूर्ती स्टॉल्सवरही गर्दी दिसून आली.
लाडक्या गणरायाचे आज आगमन
By admin | Published: September 16, 2015 11:50 PM