गणेश धुरी नाशिकजिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण संवर्गातील महिला राखीव असून, अध्यक्षपदाचा लालदिवा कसमादेला की चायना अर्थात दख्खन भागाला अशी चर्चा जोरात सुरू झाली आहे. येत्या काही दिवसांत त्याचे उत्तर मिळेलही, तूर्तास या लालदिव्यावरून कसमादे की दख्खन अशी स्पर्धा सुरू झाली आहे.अध्यक्षपद सर्वसाधारण संवर्गातील महिला राखीव असल्याने या पदावर महिला संवर्गातून निवडून आलेल्या कोणत्याही महिला जिल्हा परिषद सदस्याला अध्यक्ष होण्याचा मान मिळू शकतो. मात्र ज्या पक्षाचे जास्त सदस्य निवडून येतील आणि ज्या पक्षाला बहुमताचा जादूई आकडा ३७ गाठता येईल, त्याच पक्षाचा जिल्हा परिषद अध्यक्ष होईल, हे नक्की आहे. मागील तीन जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचा कार्यकाळ पाहिला तर मायावती पगारे अनुसूचित जाती संवर्गातून अध्यक्षपदी विराजमान झाल्या होत्या, तर त्यानंतरचे अध्यक्षपदाचे आरक्षण अनुसूचित जमाती महिला राखीव निघाल्याने माजीमंत्री अर्जुन पवार यांच्या थोरल्या स्नुषा जयश्री पवार यांना लालदिवा मिळाला होता. नंतरच्या अडीच वर्षांसाठी जिल्हा परिषद अध्यक्षपद हे नागारिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव झाल्याने विजयश्री चुंबळे यांना अध्यक्षपदाची संधी व लालदिवा लाभला होता. आता जिल्हा परिषद अध्यक्षपद हे सर्वसाधारण संवर्ग महिला राखीव असल्याने या संवर्गातून निवडून येणाऱ्या दहा महिला तसेच नागरिकांच्या मागास प्रवर्गातून निवडून येणाऱ्या नऊ महिला तसेच अनुसूचित जमाती संवर्गातील पंधरा तसेच अनुसूचित जाती संवर्गातील दोघा महिलांना अध्यक्ष पदाचा लालदिवा लाभू शकतो. अध्यक्ष पदासाठी सर्वसाधारण संवर्गातूनच जास्त स्पर्धा असल्याने आरक्षित संवर्गातील महिलेला संधी कमीच आहे.
लालदिवा कसमादेला की दख्खनला
By admin | Published: February 10, 2017 10:52 PM