नाशिक : कधी कधी ट्रॅक्टरभर कांदा विक्रीसाठी बाजारात नेला तरी शेतकºयाला एक लाख रुपये मिळतीलच याची खात्री नाही; पण केवळ आठ क्विंटल कांद्याने येवला तालुक्यातील महालखेडा येथील शेतकºयाला लखपती बनविले आहे. सोमवारी (दि.२) जिल्ह्यात कांदाने गाठलेल्या उच्चांकी दरामुळे ही किमया घडली आहे.परतीच्या पावसामुळे केवळ राज्यातीलच नव्हे तर परराज्यातीलही कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परिणामी देशभरात कांद्याचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा खूपच कमी असल्यामुळे राज्यभरात कांदा दराने उच्चांक गाठला आहे. मागील काही दिवसांपासून उन्हाळ कांद्याचे दर सातत्याने वाढत आहेत. कांदा दरावर नियंत्रण मिळविण्यासाठी केंद्र सरकारणे निर्यातबंदीबरोबरच व्यापाऱ्यांवर साठ्याच्या मर्यादा घालण्यासारख्या उपाययोजना केल्या, तरीही कांदा दरावर त्याचा कोणताही परीणाम झाला नाही. मध्यंतरी शासनाने कांदा आयातीचाही निर्णय घेतला, तरीही कांदा दरावर त्याचा विशेष परिणाम जाणवत नाही. सोमवारी जिल्ह्यातील विविध बाजार समित्यांमध्ये उन्हाळ कांद्याने १२,००० रुपयांचा टप्पा गाठला आहे. जिल्ह्यातील उमराणे बाजार समितीत १२,५००, सटाणा बाजार समितीत १२,३००, तर येवला बाजार समितीत १२,२५० रुपये प्रतिक्विंटल दराने कांदा विकला गेला. काही बाजार समित्यांमध्ये एखाद्या शेतकºयाला उच्चांकी दर मिळाला असला तरी सटाणा बाजार समितीत आवक झालेल्या एकूण कांद्याच्या सरासरी २५ टक्के कांद्याला उच्चांकी दर मिळाला आहे. सटाण्यात सोमवारी साधारणत: ६००० क्विंटल कांदा आवक झाली होती. दोन व्यापारी कंपन्यांनी अधिक कांदा खरेदी केल्याचे सांगण्यात आले.येवला बाजार समितीत महालखेडा येथील पुंडलिक अहिलाजी हांडे या शेतकºयाने आपला केवळ ८.६५ क्विंटल उन्हाळ कांदा विक्रीसाठी आणला होता. या शेतकºयाला उच्चांकी १२,२५० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. कांदा विक्रीतून या शेतकºयाला एकूण १,०५,९६२.५० रुपये, तर खर्च वजा जाता १,०५,८७० रुपये उत्पन्न मिळाले आहे.जिल्ह्यात पावसामुळे कांदा रोपांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शेतकºयांनी पुन्हा रोपांची लागवड केली आहे. रोपे लागवडीयोग्य होण्यास अद्याप अवधी असल्याने पुढील महिना- दोन महिने कांदा भाव खाणार असे चित्र सध्या दिसत आहे.
आठ क्विंटल कांद्याने शेतकऱ्याला केले लखपती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2019 2:03 AM