पंचवटी : हनुमानवाडी मोरे मळ्यातील शिंदे मळा परिसरात गुरुवारी पहाटे चोरट्यांनी गाई-म्हशीच्या गोठ्यातून घरात प्रवेश करून घरातील कपाटातून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे लाखो रुपयांचा ऐवज चोरून घरफोडी केल्याची घटना उघडकीस आली आहे.शिंदे मळा परिसरात जनार्दन लक्ष्मण शिंदे हे राहत असून, त्यांचा शेती व्यवसाय आहे. गुरुवारी पहाटे शिंदे कुटुंबातील सदस्य झोपलेले असताना चोरट्यांनी त्यांच्या घरामागे असलेल्या गोठ्यातून घरात प्रवेश केला व लोखंडी कपाटात ठेवलेले अंदाजे १५ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व ५ तोळे चांदीचे दागिने तसेच ४५ हजार रु पयांची रोकड असा अंदाजे लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेला. सकाळी शिंदे कुटुंबातील सदस्य नेहेमीप्रमाणे उठले असता घरातील कपाट उघडे दिसले व कपाटातील कपडे तसेच अन्य वस्तू जमिनीवर अस्ताव्यस्त पडलेल्या दिसल्या तसेच दागिने असलेले बॉक्स रिकामे दिसले त्यावरून घरात चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तत्काळ पंचवटी पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर घटनास्थळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत व पथकाने घटनास्थळी पाहणी केली.
घरफोडीत शेतकऱ्यांचे लाखोंचे दागिने लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2020 11:41 PM