मालेगाव : मुंबई - आग्रा महामार्गावर तालुक्यातील टेहरे फाटा येथे हॉटेल राजधानीसमोर ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून पशुखाद्याच्या ट्रकमधून वाहतूक करण्यात येत असलेला लाखो रुपयांचा मद्यसाठा जप्त केला. गुरुवारी (दि. १८) रात्री ९ वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. छावणी पोलीस ठाण्यातील कर्मचारी पंकज भोये व भूषण खैरनार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पोलिसांनी सापळा रचला. त्यांनी मालवाहू ट्रकवर छापा टाकून पशुखाद्याच्या गोण्यांच्या आड लपवून ठेवलेला लाखोंचा मद्यसाठा जप्त केला. याप्रकरणी ट्रकचालक सलीम इरफान अली (२३, रा. गाझीयाबाद, उत्तर प्रदेश) यास ताब्यात घेण्यात आले. त्यास विश्वासात घेऊन चौकशी केली असता मद्यसाठ्याचे मालक अतुल मदन असल्याची माहिती मिळाली. खारघर येथील विनोद राव यांच्या मालकीचा ट्रक असून, छाप्यात देशी-विदेशी मद्याचे ४९८ बॉक्स त्यात आयबी, सिग्नेचर, १०० पायपर, किंगफिशर बिअर व देशी दारूचा अवैधसाठा मिळून आला. तीन लाख ३६ हजार रुपये किमतीचे इम्पेरियल ब्ल्यू व्हिस्कीचे ५० बॉक्स, ९३ हजार ६०० रुपये किमतीचे किंगफिशर स्ट्रॉंग बिअरचे ३० बॉक्स, १० लाख २७ हजार रुपये किमतीचे रॉकेट संत्रा देशी दारूचे ३९५ बॉक्स, ३० हजार रुपये किमतीचा १०० पायपर डिलक्स स्कॉच व्हिस्कीच्या १२ बाटल्या, १४ हजार ३०० रुपये किमतीच्या सिग्नेचर व्हिस्कीच्या ११ बाटल्या असा एकूण १५ लाख ९०० रुपये किमतीचा देशी-विदेशी मद्यसाठा जप्त करण्यात आला, तर दोन लाख ४५ हजार ७६३ रुपये किमतीचा मद्यसाठा लपविण्यासाठी वापरलेला गव्हाचा चुरा भरलेल्या सफेद रंगाच्या ७०५ गोण्या, २० लाख रुपये किमतीचा टाटा कंपनीचा ट्रक (क्र. एमएच ४३ वाय २६८७), ४४ हजारांची रोकड आणि १० हजारांचा भ्रमणध्वनी संच यांचा त्यात समावेश आहे. ट्रक, जनावरांचे पशुखाद्य, रोकड व भ्रमणध्वनी संच असा एकूण ३८ लाख ६६३ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मद्यसाठा घेऊन जाण्यासाठी मदत करणारा सचिन बाबूराव नेतावटे, रा. पंचवटी, नाशिक यास ताब्यात घेण्यात आले. आरोपींना न्यायालयात उभे केले असता त्यांना ५ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. छावणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अवैध मद्यसाठा चांदवड येथून कोठे नेला जात होता याचा तपास सुरू आहे.
टेहरे फाट्यावर लाखोंचा मद्यसाठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2020 9:41 PM