सिडको : येथील सिद्धिविनायक कॉलनीतील एका बंद बंगल्याच्या खिडकीचे गज कापून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश करत बंगल्यातील कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम, असा लाखो रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना घडली आहे. चोरट्यांनी दुसऱ्यांदा याच बंगल्याला लक्ष्य केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
जुने सिडको भागातील खांडे मळा येथे श्री सिद्धिविनायक कॉलनी येथे सुखात्मे बंगला आहे. या बंगल्यात सुखात्मे दाम्पत्य वास्तव्यास असून, शनिवारी (दि.२४) ते कामानिमित्त बंगला योग्यरीत्या बंद करून घराबाहेर पडले होते; परंतु अज्ञात चोरट्यांनी बंगल्याच्या पाठीमागील बाजूस असलेल्या खिडकीचे गज कापून आतमध्ये प्रवेश केला आणि कपाटातील सोन्या- चांदीचे दागिने, रोख रक्कम, असा ऐवज लंपास केला. चोरी झाल्याची घटना समजताच अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार चौधरी, पोलीस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर, पोलीस उपनिरीक्षक गणेश शिंदे यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. तत्काळ श्वान पथकालाही येथे पाचारण करण्यात आले. सुखात्मे यांच्या बंगल्यातील सर्व खोल्यांमध्ये असलेले कपाटे अज्ञात चोरट्यांनी सर्व साहित्य अस्ताव्यस्त फेकून बंगल्यातील सोन्या- चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.